कारागृह सुरक्षेत वाढ
By admin | Published: April 2, 2015 12:32 AM2015-04-02T00:32:18+5:302015-04-02T00:32:18+5:30
नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी खतरनाक पाच कैदी पळून गेल्याच्या पार्श्वभूमिवर दक्षतेच्या अनुषंगाने बुधवारी येथील मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अमरावती : नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी खतरनाक पाच कैदी पळून गेल्याच्या पार्श्वभूमिवर दक्षतेच्या अनुषंगाने बुधवारी येथील मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन्ही टेहाळणी मनोऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून आत व बाहेर सुरक्षा रक्षकांना ‘जागते रहो’ च्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भातील अतीसंरक्षित असलेल्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून पाच कैदी पळून गेल्याच्या पार्श्वभूमिवर कारागृह प्रशासन विभागाच्या महासंचालकांनी राज्यभरातील कारागृहात दक्षतेच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. कारागृहाच्या मागील बाजुने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक वाहन, हालचालींवर लक्ष देण्यासाठी टेहाळणी मनोऱ्यावर दुर्बिणधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. कारागृह परिसरात येणाऱ्या व्यक्तींवरही बारकाईने नजर ठेवली जात आहे. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वावर सुरक्षेच्या अनुषंगाने लावण्यात आलेले मेटल डिटेक्टरमधूनच अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रवेश अनिवार्य करण्यात आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी ये- जा करताना प्रत्येक सुरक्षा सुरक्षा रक्षकाची कसून तपासणी केली जात आहे. कामानिमित्त अथवा न्यायालयात तारखेवर जाणाऱ्या कैद्यांची झाडाझडती घेतली जात आहे. प्रत्येक बराकीत सुरक्षा रक्षकासह कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले कैदी (पिवळी पट्टीधारक पोषाख परिधान करणारे) यांच्यावरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहाची बाहेरील भिंत १८ ते २० फूट असून संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हल्ली कारागृहात नक्षलवादी, मोका या गंभीर गुन्ह्यातील आरोपी ठेवण्यात आले नाही.
शहरातील टोळी युद्धाचे काही आरोपी आमोर- सामोर येवू नये, याची खबरदारी कारागृह प्रशासन घेत आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील तीन आरोपी असले तरी त्यांना सामान्य बराकीतच ठेवले जात आहे. अतिसुरक्षित अंडा बरकातील एकही कैदी ठेवण्यात आले नाही, हे विशेष.
राष्ट्रीय महामार्गावरुन धोकाच?
येथील मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्यावरुन कारागृहाचा आतील भाग बऱ्यापैकी दिसून पडतो. कैद्यांच्या हालचाली देखील टिपता येतात. अमरावती मध्यवर्ती कारागृह सुरक्षित आहे, यात दुमत नाही. मात्र, राष्ट्रीय महामार्ग अगदी कारागृहाच्या संरक्षण भिंतीला खेटून असल्याने नागपूर येथील पुर्नरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.
मेडिकलच्या नावे कैद्यांची मौजमजा
कारागृहात बाहेर पडायचे असेल तर कारागृहाच्या आतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ‘रेफर टू इर्वीन’ असा अभिप्राय मिळविला की, येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी कक्षात मौजमजा करता येत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. कोणताही गंभीर आजार नसताना मागील चार दिवसांपासून मेडिकलच्या नावे टोळी युद्धातील एक आरोपी इर्वीनमध्ये मौजमजा करीत आहे. हा सर्व प्रकार कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुनच केला जातो, हे वास्तव आहे.
तोकडा कर्मचारी वर्ग; सुरक्षेवर ताण
अमरावती मध्यवर्ती कारागृहात तोकडा कर्मचारी वर्ग असल्याने सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण वाढला आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्यांना काही काळ ब्रेक लावण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक, तुरुंगाधिकारी ही पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. रिक्त असलेल्या जागा संदर्भात कारागृह महानिरिक्षकांना वारंवार अवगत करण्यात आले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागपूर येथील पाच कैदी पळाल्याची घटना ही कर्मचारी कमी असल्यानेच घडली असावीत, असा कयास बांधला जात आहे.
नागपूर कारागृहाच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. आत, बाहेर दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर बारकाईने लक्ष असून संशयास्पद व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. कारागृह हे मध्यवस्तीत असल्यामुळे चोख संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
-एन. एस. क्षीरसागर
तुरुंगाधिकारी, मध्यवर्ती कारागृह .