दोष सिद्धीचे प्रमाण आठ टक्क्यांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:36 PM2019-01-13T22:36:21+5:302019-01-13T22:37:19+5:30
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यातंर्गंत घडलेल्या तीन वर्षांतील विविध गुन्हेविषयक खटल्यांपैकी १ हजार ९५६ प्रकरणांमधील आरोपींचे दोष सिध्द झाले आहे. गेल्या २०१७ या वर्षांच्या तुलनेत यंदा दोष सिध्दीचे प्रमाण ८.५० टक्यांनी वाढ झाल्याची नोंद कोर्ट मॉनिटरींग सेलने नोंदविली आहे.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यातंर्गंत घडलेल्या तीन वर्षांतील विविध गुन्हेविषयक खटल्यांपैकी १ हजार ९५६ प्रकरणांमधील आरोपींचे दोष सिध्द झाले आहे. गेल्या २०१७ या वर्षांच्या तुलनेत यंदा दोष सिध्दीचे प्रमाण ८.५० टक्यांनी वाढ झाल्याची नोंद कोर्ट मॉनिटरींग सेलने नोंदविली आहे.
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दोष सिध्दीचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तासह त्याच्या अधिनस्त यंत्रणा प्रयत्न करतात. गेल्या तीन वर्षांचा लेखाजोखा पाहता शहर पोलिसांच्या प्रयत्नाना यश आल्याने दिसून येत आहे. २०१६ मध्ये कनिष्ठ स्तर न्यायालयात चाललेल्या १ हजार ७६२ प्रकरणांमध्ये सुनावणी झाली. यात ४३८ प्रकरणांमध्ये दोष सिध्द झाले तर, १ हजार ३१४ प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. ही टक्केवारी २४.८५ आहे. त्या तुलनेत २०१७ मध्ये दोषसिध्दीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. २०१७ मध्ये १ हजार ९६५ प्रकरणांची सुनावणी झाली. त्यात ६३९ प्रकरणांत दोष सिध्द झालेत, तर १ हजार ३२६ प्रकरणात आरोपी निर्दोष झाले. ही टक्केवारी ३२.५१ इतकी आहे. २०१८ मध्ये १ हजार ८३६ प्रकरणांच्या सुनावणीनंतर ८३६ प्रकरणांमध्ये दोष सिध्द झाले, तर २ हजार प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. ही टक्केवारी ४४.१५ आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत २०१८ मधील ही टक्केवारी ८.५० ने वाढल्याचे आढळून आले आहे. ही वाढती टक्केवारी पोलीस विभागाची यशस्वी वाटचाल आहे.
उत्कृष्ठ अधिकाऱ्यांमुळे हे यश : पोलीस आयुक्त
सीएमसीत उत्कृष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करून सर्व ठाणेदारांना सूचना दिल्या. मुख्यमंत्री यांनी कन्व्हेक्शन रेषो वाढविण्यासाठी जे मापदंड व नियम घालून दिले. त्याची तंतोतंत अमलंबजावणी कशी होईल, याला प्राधान्य देण्यात आले. ते सुध्दा दैनदिन कामाव्यक्तीरिक्त. या यशाचे श्रेय कोर्टात काम करणारे पैरवी अधिकारी व ठाण्यातील पोलिसांना जाते. याशिवाय तिन्ही पोलीस उपायुक्तांकडे मॉनिटरींग सेलचे काम सोपविले होते. त्यांनी आपआपल्या ठाण्याच्या पोलिसांना वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहन केले. त्यामुळेच हे यश मिळाले, असे पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर म्हणाले.
जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रकरणे
जिल्हा व सत्र न्यायालयात (शेषन कोर्ट) चाललेल्या गंभीर गुन्ह्याच्या खटल्यांमध्ये २०१६ साली १२४ प्रकरणे सुनावणीसाठी होते. त्यापैकी १२ प्रकरणांमध्ये दोष सिध्द झाले असून, ११२ दोषमुक्त झाले. ही टक्केवारी ९.६७ आहे. सन २०१७ मधील १५४ प्रकरणामध्ये १९ मध्ये दोष सिध्द तर १३५ प्रकरणांत दोष मुक्त झाले. ही टक्केवारी १२.३३ आहे. सन २०१८ मध्ये १५२ प्रकरणांच्या सुनावणीत १२ दोष सिध्द झाले असून, १४० निर्दोष मुक्त झाले आहे. ही टक्केवारी ९ टक्के आहे.
कोर्ट मॉनिटरींग सेलची जबाबदारी
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गु्न्ह्यांमध्ये दोष सिध्दीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येते. त्यानुसार पोलीस विविध गुन्ह्यांच्या तपासात ठोस पुरावे गोळा करतात व दोषारोपत्र मजबूत बनविण्याचे प्रयत्न करतात. न्यायालयात खटल्यांवर लक्ष ठेऊन पाठपुरावा करण्यासाठी कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहे. समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन आहे. पोलीस आयुक्तालयात कोर्ट मॉनिटरींग सेल न्यायालयातील खटल्यावर लक्ष ठेऊन आहे.