सुतळीला गाठी मारून ‘त्यांनी’ दिला कामाचा पुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 10:59 PM2017-09-06T22:59:50+5:302017-09-06T23:00:33+5:30
अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या आदिवासींवर मध्यस्थ दलालच अन्याय करीत असल्याचा प्रकार तालुक्यातील बामादेही येथील ग्रामसभेत उघडकीस आला. चार महिन्यांपासून मग्रारोहयोच्या कामाचे वेतन अप्राप्त असलेल्या आदिवासीने पती-पत्नीच्या कामाचा पुरावा म्हणून घरातील एका सुतळीला गाठी मारून कामावर हजर असल्याचा पारंपारिक पुरावाच ग्रामसभेत सादर केला. यामुळे उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आणि आदिवासींची व्यथा देखील त्यांच्या मनाला जाऊन भिडली. यानंतर उपस्थित अनेक आदिवासी ग्रामस्थांनी याबाबत संबंधितांकडे तक्रार केली. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आजही शिक्षणाचा अभाव आहे. येथील आदिवासी निरक्षर आहेत.
ग्रामसभेत कामांच्या दिवसांवर वाद
चिखलदरा : त्यांना लिहिता-वाचता येत नाही. परिणामी सोयीनुसार सरळसोट व पारंपारिक पद्धतींचाच उपयोग केला जातो. बामदेही ग्रामपंचायतींतर्गत येणाºया बागदरी येथील बिरजू लाभलाल उईके आणि त्याची पत्नी कुंदिया बिरजू उईके यांनी बागदरीसह आसपासच्या परिसरात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सीसीटी पांदण रस्त्याचे काम केले. मागील चार महिन्यांपासून हे दाम्पत्य काम करीत आहे. असे असताना सुद्धा त्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीच वेळ आली आहे. त्यांनी ही व्यथा बामदेही येथील ग्रामसभेत मांडली. यादाम्पत्याने किती दिवस काम केले, यावर चांगलाच वाद झाला. अनेक मजुरांचे वेतन न मिळाल्याने ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.
इतर अनेक मजुरांचे वेतन रखडले, शासनाकडे तक्रार
ग्रामसभेत बिरजू उईकेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात तब्बल १६ आठवडे काम केल्याचा पुरावा म्हणून गाठी मारलेली सुतळी सादर केली. बिरजू उईकेची तक्रार रास्त असून त्याच्यासह इतरही मजुरांचे वेतन रखडल्याची तक्रार संबंधितांकडे करण्यात आल्याची माहिती बामदेहीचे उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बिरजू उईकेने सादर केलेला सुतळीच्या पुराव्याची परिसरात चर्चा होेती.
सरपंचासह गावकºयांनी पुरावा धरला ग्राह्य
१६ आठवडे सपत्नीक मग्रारोहयोची कामे केल्याचा पुरावा असल्याचे बिरजू उईके या मजुराने ग्रामसभेपुढे सांगितले. बिरजू उईके यांच्याकडे लेखी पुरावा असल्याचा संशय गावकºयांना होता. मात्र, त्याने त्याच्या बांडीसच्या खिशातून ग्रामसभेपुढे सादर केलेला पुरावा पाहून सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. लिहिता-वाचता न येणाºया बिरजूने त्याच्या व त्याच्या पत्नीच्या हजेरीची नोंद एका सुतळीला गाठी मारून करून ठेवली होेती. त्याने त्या सुतळीवर एकूण बत्तीस गाठी मारल्या होत्या. सरपंच मुन्नी कास्देकर, उपसरपंच मिश्रीलाल झाडखंडे, ग्रापं सदस्य व गावकºयांनी देखील त्याची ही बाब ग्राह्य धरून त्याच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार संबंधित अधिकाºयांकडे केली आहे. विज्ञान युगातील हा सुतळीचा पुरावा मेळघाटात चर्चेचा विषय ठरला असला तरी निरक्षर बिरजू याने न्यायाची केलेली मागणी रास्तच आहे.