बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:40+5:302021-09-10T04:18:40+5:30
अमरावती : सतत पाऊस आणि कोरोना सारख्या नकारात्मक बाबी जाताना मागे सारून भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणाऱ्या लाडक्या गणपती ...
अमरावती : सतत पाऊस आणि कोरोना सारख्या नकारात्मक बाबी जाताना मागे सारून भक्तांना आपल्या भक्तीत दंग करणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमनाची प्रतिक्षा जवळपास संपत आली आहे.त्यामुळे गुरूवारी शहरातील बाजारपेठेत सजावट व पूजेचे साहित्य खरेदीला उधाण आले आहे. दिवाळीनंतर तब्बल आठ महिन्यांनी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ बाजारपेठेत दिसून आली. दुसरीकडे घराघरात आरासाच्या मांडणीची लगबग सुरू आहे.
गणेशोत्सव शुक्रवार १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत मखर, आरास, विद्युत माळा, फुलांच्या माळा, वेल झुंबर, तोरण, पडदे अशा साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. पूजेच्या साहित्याचीही खरेदी करताना लगबग दिसून आली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या हाेत्या. दुसरीकडे घराघरात सजावट आरासाच्या साहित्याची मांडणी सुरू झाली आहे. गतवर्षी सांभाळून जपून ठेवलेले सजावटीचे साहित्य काढून ते स्वच्छ करणे, त्यातील खराब झालेले साहित्य बाजूला काढून यंदाची आरास कशी करायची यावर मंथन करून घरांमध्ये मांडणीची तयारी सुरू असल्याचे दिसून आले.
बॉक्स
सूचनांचे पालन करा प्रशासनाचे आवाहन
काेरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना, आदेशांचे पालन करून सहकार्य करा असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे. गणेश मंडळांनी दर्शनासाठी गर्दी होऊ न देता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.