मालमत्ता कर योजनेची आज संपणार मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:14 AM2021-03-25T04:14:41+5:302021-03-25T04:14:41+5:30
अमरावती : मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीसाठी 'मालमत्ता कर ...
अमरावती : मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीसाठी 'मालमत्ता कर अभय योजना लागू करण्यात आली. दरम्यान फेब्रुवारीत पुन्हा लॉकडाऊन केल्याने नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास असुविधा निर्माण झाली होती. त्यामुळे ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याने या योजनेचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. थकबाकीदारांनी मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक २० टक्के दंडात्मक रकमेचा भरणा केल्यास त्यांना ८० टक्के प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळत आहे. मात्र, ही रक्कम व ८० टक्के सवलत वगळून उर्वरित २० टक्के दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरावयाची आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेला अभय योजना लागू राहणार नाही. अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रकमांना अभय योजना लागू राहणार नाही व अभय योजना सुरू होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी अभय योजनेंतर्गत दावा करता येणार नाही.
अभय योजनेअंतर्गत महापालिका मुख्यालय, सर्व पाचही झोन कार्यालये तसेच सर्व भरणा केंद्रे या ठिकाणी रोख, धनादेश,धनाकर्ष याव्दारे रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.