जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक मशीन खरेदीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 12:07 AM2016-02-13T00:07:02+5:302016-02-13T00:07:02+5:30
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एरव्ही कार्यालयतात शासकीय कार्यालयीन वेळेला दांडी देत वाटेल...
प्रक्रिया सुरू : तीन लाख रूपयांच्या निधीची तरतूद
अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एरव्ही कार्यालयतात शासकीय कार्यालयीन वेळेला दांडी देत वाटेल तेव्हा कार्यालय गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी जिल्हा कर्मचाऱ्यांच्या या नित्याच्या सवईला कायमचा लगाम घालण्याचे दुष्ट्रीने सर्व विभागात बायोमेट्रिक मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासनाने सुमारे तीन लाख रूपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.
लोकमतने जिल्हा परिषदेतील लेटलतिफ कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याचा प्रकार आणि कार्यालयीन वेळेत बाहेर चहा व पानटपरी तसेच गप्पा करण्याचे नित्याचे प्रकार उजेडात आणताच या वृत्ताची दखल जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी घेतली. याच विषयावर जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमुखांची संयुक्त बैठक त्यांच्या दालनात घेऊन कर्मचाऱ्यांचे असे प्रकार योग्य नसल्याचा निर्वाळा देत या प्रकाराला आळा घालून कार्यालयीन शिस्त प्रत्येकाने पाळणे अपेक्षित असल्याचे बैठकीत सांगितले. याशिवाय प्रत्येक कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्याची व जाण्याची वेळ रजिस्टर मध्ये ठेवण्याबाबत सुचना केल्या आहेत.
याशिवाय अधिकाऱ्यांनीही जिल्ह्याबाहेर जातांना पूर्व परवानगी घेतल्या शिवाय जाऊ नये असा आदेशही काढला आहे. सोबतच सर्व विभागात तातडीने बॉयोमेट्रिक यंत्रणा बसविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने बॉयोमेट्रिक मशीन खरेदीसाठी सुमारे तीन लाख रूपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तातडीने या निधीस मंजुरीसुध्दा दिली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेतील १४ विभागांत बायोमेट्रिक यंत्रणा बसविली जाणार आहे. यामुळे लेटलतिफ कर्मचाऱ्यांच्या सवईला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)