राज्यात कैदी माफी कपातीच्या शिक्षेपासून वंचित, 3 वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 04:59 PM2018-08-26T16:59:50+5:302018-08-26T17:04:36+5:30
कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गणेश वासनिक
अमरावती : हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे न्यायालयाच्या निर्णयानुसार विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी माफी कपातीच्या शिक्षेपासून वंचित आहे. कारागृह महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही पात्र कैद्यांनी माफी पुस्तकावर घेणेबाबत विनंती करूनही त्यांचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरिक्षक डॉ. भूषण उपाध्याय यांनी २७ मे २०१६ रोजी राज्याचे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, खुले कारागृह, महिला कारागृहांच्या अधीक्षकांना सूचनापत्राद्वारे कैद्यांना देण्यात येणाऱ्या माफी कपातीच्या शिक्षेबाबत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्र कारागृह माफी पद्धती नियम १९६२ मधील नियम २४(२) नुसार अधीक्षकांना कैद्यांना नियम २३ नुसार माफी पुस्तकावरून कायमस्वरूपी कमी करण्याची शिक्षा देण्याचे अधिकार बहाल केले आहे. त्यानुसार विभागीय कारागृह उपमहानिरिक्षकांच्या पूर्व मान्यतेने माफी पुस्तकावर पुन्हा कैद्यांना घेता येते. तसेच माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिल्यानंतर कैद्यास अन्य कारागृहात वर्ग करण्यात आले असेल तर वर्ग करण्यात आलेल्या कारागृहाचे अधीक्षक कैद्यास पुन्हा माफी पुस्तकावर घेण्याकरिता विभागीय उपमहानिरिक्षकांना ज्या कारागृह अधीक्षकांनी माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिलेली आहे, त्यांच्यामार्फत शिफारस करू शकतात.
ज्या कैद्यांना कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कपात केल्याची शिक्षा देण्यात आली, अशा कैद्यांना पुन्हा माफी पुस्तकावर घेणेसाठी विनंती अर्ज कारागृह कार्यालय तसेच शासनाकडे सादर केल्यास त्या कैद्यांना याचा लाभ मिळते. मात्र, २ ते ३ वर्षांच्या कालावधी होऊनही कारागृह महानिरिक्षकांच्या सूचनापत्राचे पालन करण्यात आले नाही. काही कैद्यांची वर्तणूक आणि वागणूक अतिशय चांगली असतानाही ते माफीच्या शिक्षेपासून वंचित असल्याचे वास्तव आहे. मुंबईचे आर्थर रोड, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, येरवडा, नागपूर, अमरावती, तडोजा आणि कोल्हापूर या ९ मध्यवर्ती कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदी माफी कपाती शिक्षेपासून वंचित आहेत.
कैद्यांचे सुधारणा व पुनर्वसन उपक्रमांतर्गत न्याय
कारागृहाच्या पाषाण भिंतीआड शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये चांगली वर्तणूक आणि सुधारणा होण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. त्याअनुषंगाने कैद्यांचे सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत माफीच्या स्वरूपात मोबदला देण्याची नियमावली आहे. कैद्यांना कारागृहात सुरक्षित ठेवणे जिकरीचे काम आहे. मात्र, काही कैद्यांचे कोणतेही विघातक कृत्य किंवा वाईट उद्देश नाही, अशा कैद्यांना कायमस्वरूपी माफी कपातीमुळे मानसिक तणाव कमी करणे हा देखील यामागील हेतू आहे.
हे कैदी ठरतील शिक्षेच्या माफीचे हकदार
कारागृहात शिक्षा भोगत असताना कैद्यास कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कमी केल्याच्या शिक्षेनंतर कैद्यांची कारागृहातील वागणूक चांगली असली तरी त्यास माफी मिळत नाही. त्याकरिता कैद्यास कायमस्वरूपी माफी पुस्तकावरून कमी करण्याची शिक्षा दिल्यानंतर शक्यतो ५ वर्षांच्या कालावधीतील कारागृहातील वर्तणुकीची शहानिशा करून कैद्याची वर्तणूक चांगली असल्यास त्यास पुन्हा माफी पुस्तकावर घेण्याबाबत नियम क्रमांक २४(१) व (२) नुसार योग्य ती कार्यवाही करता येते.
नियमानुसार माफी कपात शिक्षेस पात्र कैद्यांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतात. कैद्यांचे माफी कपातीबाबत वरिष्ठांचे आदेश आल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती