अमरावती विद्यापीठात नवीन आठ महाविद्यालयांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:15 PM2020-06-30T12:15:46+5:302020-06-30T12:17:33+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने नवीन आठ महाविद्यालयांना मान्यता प्रदान केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत नवीन आठ महाविद्यालयांच्या प्रस्तावांना अधिष्ठाता मंडळाने मान्यता प्रदान केली आहे. आता राज्य शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी ते प्रस्ताव विद्यापीठातून पाठविले जाणार आहेत. हल्ली विद्यापीठाशी संलग्न ३९४ महाविद्यालये आहेत.
सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनादेश क्रमांक मान्यता ३१ जानेवारी २०१९ नुसार १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या इरादा पत्रानुसार शासन निर्णय क्रमांक एनजीसी- २०१७ अन्वये १५ सप्टेंबर २०१७ नुसार संस्थांकडून महाविद्यालयांचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने नवीन आठ महाविद्यालयांना मान्यता प्रदान केली आहे.
यात बुलडाणा जिल्ह्यातील डोंगर खंडाळा येथे श्रीमती बसंतीबाई देवकिशनजी चांडक सहकार कला व वाणिज्य महाविद्यालय, सिंदखेड राजा येथे उत्कर्ष कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे तक्षशीला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला जिल्ह्यात अकोट येथे श्री. सरस्वती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथे शामबाई नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळ जिल्हा आर्णी तालुक्यातील जवळा येथे स्व. भारतसिंह ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथे डॉ. एम. एस. गोरडे विज्ञान महाविद्यालयांचा समावेश आहे. शासनाच्या उच्च व शिक्षण विभागाकडून मान्यताप्राप्त झाल्यानंतर हे आठही महाविद्याललये सुरू होतील, असे संकेत आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांना ‘ना’
अमरावती विद्यापीठ अंतर्गत नव्याने आठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचा समावेश आहे. यात एकही प्रस्ताव अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबत नाही, हे स्पष्ट होते. अमरावती विद्यापीठ संलग्न २६ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, यातील काही महाविद्यालयांच्या शाखा बंद केल्या आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचा कल विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चालल्याचे प्रवेशाच्या संख्येवरून दिसून येत आहे.