समृद्धी महामार्गालगत नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:24 AM2021-02-21T04:24:53+5:302021-02-21T04:24:53+5:30
पान ३ चे लिड मोहन राऊत धामणगाव रेल्वे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार ...
पान ३ चे लिड
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार करण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून, एका पथकाने नुकतीच या भागाची पाहणी केली आहे.
समृद्धी महामार्गाचे कामकाज सध्या ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. हा महामार्ग येत्या १ मे पर्यंत रहदारीकरिता सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. सोबतच या द्रुतगती महामार्गालगत नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन धावण्याकरिता रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता १५ दिवसांपूर्वी एका पथकाने जागेची पाहणी केली. बुलेट ट्रेन मार्गाकरिता अधिक जागा लागली, तर ती जमीन अधिग्रहित करण्यासाठी या पथकाने रस्ते विकास महामंडळाच्या यंत्रणेशी चर्चा केली आहे.
चार तासांत गाठता येणार मुबंई
७४१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाशेजारून बुलेट ट्रेन धावण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने परवानगी दिली, तर नागपूर-मुंबई अंतर केवळ चार तासांत गाठता येणार आहे.
असा राहणार बुलेट ट्रेन मार्ग
समृद्धी महामार्गालगत बुलेट ट्रेन प्रस्तावाला मंजुरात मिळाली, तर नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, मेहकर, जालना औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर, मुंबई असा बुलेट ट्रेनचा मार्ग राहू शकणार आहे.
कोट
समृद्धी महामार्गाशेजारून बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्यासाठी एका पथकाने पाहणी केली. रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेली जागा याकरिता देण्यात येणार आहे.
- गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ, अमरावती