महाबीजसह १५ कंपन्यांवर कारवाईचा प्रस्ताव
By admin | Published: November 22, 2014 10:51 PM2014-11-22T22:51:43+5:302014-11-22T22:51:43+5:30
पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत.
वांझोटे सोयाबीन बियाणे : परताव्यासाठी महाबीजवर धडकणार शेतकरी
गजानन मोहोड - अमरावती
पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी दाखल झाल्यात. प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर २७० नमूने नापास झालेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महाबीज विषयी आहेत. त्यामुळे महाबीजसह अन्य १५ कंपन्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहेत.
वांझोट्या बियाण्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झालेले पूर्णानगर व परिसरातील शेतकरी परताव्याच्या मागणीसाठी धडकणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. दीड महिना उशिराने आलेला पाऊस, निकृष्ट व उगवणशक्ती नसलेले बियाण्यांमुळे बहुतांश क्षेत्रात सोयाबीन उगवलेच नाही. पेरणीच्या मोसमात महाबीजसह अन्य बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेल्या बियाण्यांची विक्री केल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी कंपनीच्या बॅच व पावतीसह कृषी विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.