अनुदानावरील फळबाग योजनांसाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:58+5:302021-06-18T04:09:58+5:30
तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन; दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ. चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला ...
तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन;
दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ.
चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला सलग फळबाग लागवडसह, बांधावरील वृक्ष लागवड, फुलपिके लागवड, नाडेप कंपोस्ट, गांडूळ खत, विहीर पुनर्भरण इत्यादी योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी अनुदानावरील फळबागसह इतरही योजनांच्या
लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावे, असे तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड,यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.
सदर योजना ही फक्त दोन हेक्टर क्षेत्रधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जाॅबकार्ड, माती, पाणी परीक्षण अहवाल, ग्रामसभेचा ठराव, ७/१२, ८/अ, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अल्प, अत्यल्प शेतकरी घेऊ शकतात, तसेच अनुचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, यांचा योजनेसाठी प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.
फळबाग लागवडकरिता संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू, इत्यादींना अनुदान देण्यात येईल, तसेच बांधावरील लागवडीसाठी सांग, बांबू, शेवगा, कडूनिंब, सोनचाफा बोर, सीताफळ, आवळा, आंबा, इत्यादींना अनुदान देय असेल. त्याचप्रमाणे फुलपिकामध्ये निशिगंध, गुलाब, मोगरा, यासाठी अनुदान देण्यात येईल. कंपोज खत व गांडूळ खताच्या प्रत्येकी एका युनिटसाठी ११ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. विहीर पुनर्भरणकरिता १४ हजार रुपये अनुदान देय असेल. तरी निकषात बसणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर, आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.
प्रस्ताव सादर करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी, संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूरबाजार यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून परदेस नोटमध्ये कळविण्यात आले आहे.
(कमी पावसात पेरणी करू नका. सध्या तालुक्यातील काही भाग वगळता, अन्य ठिकाणी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरी तालुक्यातील ज्या भागात कमी पाऊस झाला आहे, येथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. आपल्या परिसरात ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. -- तालुका कृषी विभाग.चांदूर बाजार.)