अचलपूरच्या अग्निशमन वाहनावरील प्रस्तावित खर्च चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:13+5:302021-05-21T04:14:13+5:30
अनिल कडू फोटो पी २० फायर वाहन परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन वाहन क्रमांक एमएच २७ ...
अनिल कडू
फोटो पी २० फायर वाहन
परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन वाहन क्रमांक एमएच २७ एए ५१११ वरील प्रस्तावित खर्च चांगलाच चर्चिला गेला. यात नगरसेवकांनी आक्षेप नोंदविल्यामुळे हा विषय स्थागित ठेवण्यात आला.
१३ वर्षे जुन्या या अग्निशमन वाहनाच्या पंपाचे काम व इतर आवश्यक काम करण्यासाठी अंदाजित सहा लाखांच्या अपेक्षित खर्चाचा मोघम प्रस्ताव सभेपुढे संबंधित विभागाकडून ठेवण्यात आला. यावर नगरसेवक मोहम्मद सलीम मोहम्मद नजीर यांनी आक्षेप घेतला. यात नगरपालिकेचे आर्थिक नुकसान तर होत नाही ना, हे आधी तपासून बघा. मोघम प्रस्ताव मान्य करू नका. नेमका कुठल्या कामावर कुठला आणि किती खर्च होऊ शकतो, याविषयी अधिकृत यंत्रणेकडून माहिती घ्या. नंतरच प्रस्ताव सभेपुढे ठेवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. अन्य नगरसेवकांनीही या आक्षेपाला समर्थन दिले. या अग्निशमन वाहनावरील प्रस्ताविक कामांवर सहा लाखाचा खर्च येऊ शकत नाही. अवघ्या दीड-दोन लाखांत हे काम होऊ शकते, अशा प्रतिक्रियाही काही नगरसेवकांनी यावेळी दिल्यात.
माहीत मिळत नाही
नगरसेवकांनी मागितलेली माहिती प्रशासनाकडून दिली जात नाही. यावर नगरसेवक मोहम्मद सलीम यांनी खंत व्यक्त केली. अग्निशमन विभागात असलेल्या जनरेटरमध्ये मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत किती डिझेल वापरले गेले. याविषयी अद्याप नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही. माहिती का पुरविण्यात येत नाही. यात काही गैरप्रकार झाला आहे का? याबाबत चौकशी करून माहिती द्यावी. माहिती न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
बसंती फायर स्टेशनबाहेर
बसंती नामक अग्निशमन वाहन अचलपूर नगरपालिकेत १९८८ मध्ये दाखल झाले. बसंती म्हणून नावारूपास आलेले हे वाहन आजही नगर परिषदेच्या आवारात उभे आहे. दमदार अशी ही गाडी नगरपालिकेचे भूषण ठरले आहे. या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. पत्रांना जंग लागले आहे. ३३ वर्षाचा अनुभव असलेले हे वाहन आज फायर स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासह सभागृहाच्या समोर ते उभे ठेवण्यात आले आहे.