कारागृहातील कैद्याचे मृत्यू प्रकरण विधिमंडळात, टोळीयुद्धातून मृत्यू झाल्याचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 09:05 PM2017-12-05T21:05:57+5:302017-12-05T21:06:10+5:30
अमरावती : राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये कैद्यांचे मृत्यू प्रकरण नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे.
अमरावती : राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये कैद्यांचे मृत्यू प्रकरण नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. आर्णी (जि. यवतमाळ) मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांनी कैद्यांच्या आकस्मिक आणि संशयास्पद मृत्यूबाबत आक्षेप घेतला आहे.
अलीकडे राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आ. तोडसाम यांनी लक्ष्यवेधीत स्पष्ट केले आहे. कैद्यांच्या मृत्यूची कारणे, कारागृह प्रशासनाकडून उपाययोजना, मृत्यूबाबत वैद्यकीय अहवाल अशा विविध मुद्द्यांंवर आ. तोडसाम हे सभागृहाचे लक्ष वेधणार आहेत. राज्य शासनाने कारागृहाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसे मनुष्यबळ, बंदूकधारी रक्षक, मनो-यावर २४ तास पहारेकरी, वरिष्ठ अधिका-यांना सुसज्ज निवासस्थान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.
मात्र, अलीकडे कारागृहांमध्ये वाढत असलेल्या टोळीयुद्धातून कैद्यांचा मृत्यू ओढवत असताना, त्यांची नोंद आकस्मिक मृत्यू असे नमूद करण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आक्षेप तोडसाम यांनी घेतला आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहात धारणी येथील रामसिंग मंगल कास्देकर या आदिवासी तरुण कैद्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे आ. तोडसाम यांचे म्हणणे आहे. रामसिंग बराकीत मृत्यू होणे हे कारागृह प्रशासनासाठी लाजीरवाणे असल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही नाशिक, नागपूर, येरवडा, मुंबईचे आॅर्थर रोड, गडचिरोली आदी कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
कारागृहात बंद्यांचा संशयास्पद मृत्यू हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. कैद्याचा मृत्यू झाला की, कागदी घोेडे नाचवून फाइल बंद केली जाते. याप्रकरणी ठोस निर्णय घेतला जावा, यासाठी विधिमंडळात लक्षवेधी सादर करण्यात आली आहे.
- राजू तोडसाम,
आमदार, आर्णी