अर्जुननगरच्या फ्लॅटमधील देहव्यापाराचा अड्डा उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 09:56 PM2018-12-21T21:56:50+5:302018-12-21T21:57:19+5:30
दोन तरुण, एक महिला ताब्यात : जागरूक नागरिकांनी केले पोलिसांना पाचारण
अमरावती : २५ दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधील देहव्यापार स्थानिक रहिवाशांनी बंद पाडला. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी अर्जुननगर स्थित यश अपार्टमेंट येथे धाड टाकून दोन तरुणांसह एका महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात आणले.
अर्जुननगर परिसरातील जिव्हेश्वर कॉलनीतील यश अपार्टमेंट या चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर विलासनगरातील रहिवासी विधळे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. सुमारे २५ दिवसांपूर्वी एका कुटुंबाने तो फ्लॅट रिकामा केला. यानंतर घरमालकाने तो एका तरुणास भाड्याने दिला. काही दिवसांपासून त्या फ्लॅटमध्ये तरुण-तरुणींचे वेगवेगळे जोडपे संशयास्पद स्थितीत ये-जा करीत असल्याची भनक तेथील रहिवाशांना लागली होती. हा देहव्यापाराचाच प्रकार असल्याचा संशय रहिवाशांमध्ये बळावला होता. त्यामुळे येथील हालचालींबाबत पाळतदेखील ठेवण्यात आली होती. शुक्रवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास एक तरुण-तरुणीचे जोडपे फ्लॅटमध्ये आल्याचे रहिवाशांना कळले. त्यांनी या प्रकाराची माहिती तडक गाडगेनगर पोलिसांना दिली. गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक व्ही.सी. धाडसे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांना तेथे एक तरुण व तरुणी आढळून आले.
पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, एका अज्ञाताने फोन करून आम्हाला या जागी जाण्यास सांगितल्याचे ते जोडपे पोलिसांना सांगू लागले होते. यादरम्यान पोलिसांनी तरुण-तरुणीच्या जोडप्यासह भाड्याने फ्लॅट घेणाऱ्या एका तरुणास वाहनात बसवून ठाण्यात नेले.
रात्री उशिरापर्यंत गाडगेनगर पोलिसांची कारवाई सुरू होती. मात्र, वृत्त लिहिस्तोवर पोलिसांत तक्रार झाली नव्हती. भाडेकरु ठेवताना घरमालकाने त्याचे विवरण पोलिसांना देणे आवश्यक असते. मात्र, या घरमालकाने पोलिसांकडे भाडेकरुची नोंद केली नव्हती.
आरती खाडे यांचा अभिनंदनीय पुढाकार
बऱ्याच दिवसांपासून हा देहव्यापाराचा प्रकार सुरू आहे. रात्री दीड-दोन वाजेपर्यंत लोक येत-जात राहायचे. इतक्या गाड्या आणि इतके लोक यापूर्वी कधीही आले नव्हते. मुलींनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये, मुलांनी मुलींचा गैरवापर करू नये, यासाठी आम्ही सतत जागरूक आहोत. सुरुवातीला आम्ही मुलामुलींना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु बहीण आहे, नातेवाईक आहेत, फ्लॅट बघायला आलो आहोत, अशी कारणे देऊन आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अखेरीस आज आम्ही रंगेहात पकडूनच दिले, अशी माहिती आरती खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. खाडे या पेशाने शिक्षक असून त्या सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. खाडे यांच्या पुढाकाराने पोलिसांना या अड्ड्याचा पर्दाफाश करता आला.