अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध

By उज्वल भालेकर | Published: October 16, 2023 06:55 PM2023-10-16T18:55:01+5:302023-10-16T18:57:01+5:30

बदलते हवामान तसेच दरवर्षी होणारी फळगळ, उत्पादन खर्चात झालेली वाढ तर दरवर्षी संत्र्याचे घसरणारे दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे हजारो हेक्टर संत्रा बगीच्यांची तोड करत आहेत.

Protest against the government by throwing oranges in the Amravati Collectorate area | अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संत्रा फेकून शासनाचा निषेध

अमरावती - बांग्लादेश जाणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्क हटविण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला निवेदन तसेच संत्रा भेट देण्यासाठी प्रहारच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी धडकले होते. परंतु जिल्हाधिकारी यांनी निवेन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करत संतप्त प्रहार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या प्रवेशद्वारासमोरच संत्रा फेकून सरकार व प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता.

बदलते हवामान तसेच दरवर्षी होणारी फळगळ, उत्पादन खर्चात झालेली वाढ तर दरवर्षी संत्र्याचे घसरणारे दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे हजारो हेक्टर संत्रा बगीच्यांची तोड करत आहेत. यंदाही जवळपास ८० टक्के संत्रा गळतीमुळे खराब झाला. प्रशासनाला पंचनाम्यासाठी दोन वेळा निवेदन देऊनही पंचानामा झाला नाही. अशातच उरलेल्या २० टक्के संत्रा पिकालाही भाव मिळत नसल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सरकारने बांग्लादेशात जाणाऱ्या संत्रावरील आयात शुल्क हटविणे तसेच मग्रारोहयो अंतर्गत संत्रा फळपिकांचे वयोमर्यादे नुसार फळबागेला कोणतीही २ वर्षात आंतर मशागतीसाठी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यांनी सर्व शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यास मज्जाव केला.

जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांचे निवेदन आणि संत्रा स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त प्रहार शेतकरी संघटेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात नारेबाजी करत जिल्हाधिकारी परिसरातच संत्रा फेकून आंदोलन केले. सरकारने दिवाळीपूर्वी जर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली नाही तर जिल्हाभरात तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेने दिला आहे. यावेळी संजय देशमुख, मंगेश देशमुख, प्रफुल नवघरे, प्रदीप बंड, सुभाष मेश्राम, रामदास भोजने, दीपक भोंगाळे, सुनील मोहोड, अक्षय अडतरक, पुरुषोत्तम राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Protest against the government by throwing oranges in the Amravati Collectorate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.