आतिषबाजी, बँण्ड वाजून अमरावती महापालिकेवर आक्रोष मोर्चा; अस्वच्छतेविरोधात एल्गार
By उज्वल भालेकर | Published: October 9, 2023 09:07 PM2023-10-09T21:07:09+5:302023-10-09T21:07:22+5:30
शहरातील झोपडपट्टी भागातील अस्वच्छतेचा स्थानिक रहिवासी नागरिकांकडून निषेध
उज्वल भालेकर, अमरावती: शहरातील गडगडेश्वर तसेच इतर झोपडपट्टी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून घाणीचे साम्राज्य आहे. परंतु तरीही महापालिका प्रशासनाकडून नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोप करत सोमवारी महापालिकेवर मांतग समाज झोपडपट्टीवासीयांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतिषबाजी तसेच बँण्ड वाजवून अधिकाऱ्यांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशभरात स्वच्छता अभियान सुरु केले. परंतु महापालिकेतील स्वच्छता कंत्राटदाराकडून मात्र शहरातील झोपडपट्टी भागामध्ये नियमित साफ-सफाईचे कामे होत नसल्याचा आरोप होत आहे. शहरातील गडगडेश्वर प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असून येथील महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाला दारे नाहीत. तसेच स्वच्छतागृहामध्ये पाणीही नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनातून करण्यात आला. तसेच नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने यातून बाहेर पडणारे किडे हे स्थानिक रहिवासी नागरिकांच्या घरात जात आहेत. त्यामुळे महेंद्र सरकटे यांच्या नेतृत्वामध्ये झोपलेल्या मनपा प्रशासनाला जागे करण्यासाठी मांतग समाज झोपडपट्टी रहिवासी नागरिकांनी नेहरु मैदान ते महापालिका आक्रोष मोर्चा काढून फटाक्यांची आतिषबाजी तसेच बँड वाजवून महापालिकेचा निषेध केला. जर महापालिकेने आठ दिवसात गडगडेश्वर प्रभागाची स्वच्छता केली नाही तर नागरिकांच्या घरात शिरणारे किडे हे महापालिकेच्या दालनात आणून टाकण्याचा इशाराही यावेळी दिला.