प्राधिकरण कार्यालयात ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
By admin | Published: September 30, 2016 12:28 AM2016-09-30T00:28:49+5:302016-09-30T00:28:49+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायत बेलोरावासी यांना मागील एक महिन्यापासून अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने गावात कार्यालयाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.
अनियमित पाणीपुरवठा : बेलोरा ग्रामवासी आक्रमक
दर्यापूर : तालुक्यातील ग्रामपंचायत बेलोरावासी यांना मागील एक महिन्यापासून अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने गावात कार्यालयाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्याचा उद्रेक म्हणून बेलोरा ग्रामवासीय सरपंच ज्योती भारसाकळे, उपसरपंच राजेंद्र धुर्वे, अनिल पाटील भारसाकळे, संजय पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले.
संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा याकरिता चर्चा करण्यात आली. दरम्यान त्वरित सुरळीत पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर ग्रामस्थांचा रोष निवळला. त्याचबरोबर बेलोरा येथील गावाचा विद्युत पुरवठासुद्धा वारंवार खंडित होत आहे. डी.पी. अतिशय जुनी झाली असून आठ इलेक्ट्रिक पोल मंजूर झाले आहेत. हे काम विनाविलंब करण्यात यावे याकरितासुद्धा विद्युत कार्यालयावर बेलोरा ग्रामवासीयांनी हल्लाबोल केला. याप्रसंगी सतीश पाटील भारसाकळे, शामराव कुऱ्हाडे, दिलीप चारथळ, निवृत्ती चारथळ, विनोद तराळ, प्रेमदास भारसाकळे, आदींसह शेकडो ग्रामस्थ धडकले होते. (शहर प्रतिनिधी)