चांदूर बाजार तालुक्यातील तिन्ही मंडळात पीकविमा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:20+5:302021-08-01T04:12:20+5:30
चांदूर बाजार : तालुक्यातील आसेगाव, ब्राह्मणवाडा थडी व बेलोरा या तिन्ही मंडळांतील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी विमा नाकारला आहे. त्यामुळे ...
चांदूर बाजार : तालुक्यातील आसेगाव, ब्राह्मणवाडा थडी व बेलोरा या तिन्ही मंडळांतील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी विमा नाकारला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा निवेदनातून पीक विम्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नाही तर २ ऑगस्टला एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्याचा इशारा कृषी विभागाला दिला आहे.
गेल्या वर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. असे असूनही त्यांना विम्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे आरोप केला आहे. खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, आसेगाव, बेलोरा व ब्राम्हणवाडा थडी या तिन्ही मंडळांतील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक विमाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी खरिपाच्या सुरवातीला काही दिवस पावसाने नियमित हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. परंतु, मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिन झाला होता. पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पेरण्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.
रविवारी दुपारच्या सुमारास तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रफळावरील खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी शेत खरडून गेले. त्यामुळे पुन्हा पेरणीसाठी मागील नुकसानाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा उपोषणाचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.