महसूल अधिकाऱ्यांना पुरेसे पोलीस संरक्षण द्या
By Admin | Published: September 2, 2015 12:08 AM2015-09-02T00:08:38+5:302015-09-02T00:08:38+5:30
शहर व जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी महसुल विभागास पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात यावा,
अमरावती : शहर व जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी महसुल विभागास पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना आदींनी संयुक्तरीत्या जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या निवेदनात केली आहे.
मागील बऱ्याच कालावधीपासून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाचे पथकातील अधिकारी व कर्मचारी याचेवर कथीत वाळूमाफीयांकडून हल्ले करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढही होत आहे. अशा नियमित घडणाऱ्या घटनांमुळे महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच याचा शासकीय कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कथीत वाळूमाफीयांची मुजोरी वाढत असून त्यावर आळा घालणे आवश्यक आहे. या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या कथीत वाळूमाफीयांवर कठोर कारवाई करावी व अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, कार्याध्यक्ष सुरेश बगळे, अनिल भटकर, प्रदीप पवार, अरविंद माळवे, रवी महाले, सुनील उगले, राम लंके, संजय गरकल, वैशाली पाथरे, नीता लबडे, वैशाली जावरकर, उमेश खोडके, रमेश इंगोले, कन्नाटे, धीरज मांजरे, अजय पाटेकर, अनासुने, साव, कल्याणकर, नामदेव गडलिंग आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)