शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक

By उज्वल भालेकर | Published: October 17, 2023 07:22 PM2023-10-17T19:22:32+5:302023-10-17T19:22:54+5:30

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

Provide necessary health facilities to patients visiting government hospitals; Congress aggressive | शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक

शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवा; काँग्रेस आक्रमक

अमरावती: शासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आजारी असल्याची बातमी लोकमतने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केली. या बामतीची दखल घेत कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील मनुष्यबळ तसेच आवश्यक इतर सोयी-सुविधांचा आढावा घेत आंदोलन केले. यावेळी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण हा गरीब कुटुंबाती असून त्याला सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधाही कमी असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयात औषधी मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षाही रुग्ण जास्त असल्याने एका बेडवर दोन रुग्ण किंवा खाली रुग्णांना झोपावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसने या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेत रुग्णांना आवश्यक औषधी, सोयी-सुविधा, रुग्णालयाची स्वच्छता ठेवण्यासंदर्भात निवेदन दिले. 

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढा, इर्विन परिसरात ३३ के.व्ही विद्युत सबस्टेशन बसवा, रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करा, शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावे, तसेच आवश्यक यंत्रसामुग्रही शासनाने तातडीने पुरविण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे किशोर बोरकर, दिलीप एडतकर, भैय्या पवार, गणेश पाटील, आसिफ कुरेशी, नंदकिशोर कुइटे, सुजाता झाडे, विजय बर्वेअनिल देशमुख, राजा चौधरी उपस्थित होते.

ओपीडी बाहेर डॉक्टरांच्या नावाचे फलक लावा
ओपीडीच्या वेळी अनेक डॉक्टर उशीरा येत असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे संबधित ओपीडीतील डॉक्टर आणि त्यांचे मोबाईल क्रमांक असलेले फलक लावण्यात यावे. तसेच २४ तास रक्तपेढी सुरु ठेवण्याची मागणीही यावेळी काँग्रेसने केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनीही या मागण्या मान्य करुन तातडीने अमंलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Provide necessary health facilities to patients visiting government hospitals; Congress aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.