अवकाळीचा १७.५२ कोटींचा निधी उपलब्ध
By admin | Published: March 22, 2016 12:30 AM2016-03-22T00:30:34+5:302016-03-22T00:30:34+5:30
जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले.
मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा
अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष पॅकेजअंतर्गत शासनाने १७ कोटी ५२ लाखांचा निधी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला वितरित केला आहे.
हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये ७० हेक्टरमधील भात, ५ हजार ८०६ हेक्टरमधील कपाशी, १० हजार ४१ हेक्टरमधील सोयाबीन, १६ हजार ५४२ हेक्टरमधील तूर, ३ हजार १४५ हेक्टरमधील मूग व उडीद, ६५.४९ हेक्टरमधील ज्वारी व १८६ हेक्टर मधील इतर पिके बाधित झाली, असे एकूण ३५ हजार ८२८ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले होते.
तसेच फळपिकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी, असे १ हजार ११७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाद्वारा प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
यंदाच्या एप्रिल ते जून मधील नुकसानीसाठी मदत
यंदा एप्रिल ते जून महिन्यात वादळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील थोड्या प्रमाणात शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाने शुक्रवारी ३ लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध केला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
सन २०१४-१५ मधील अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाही शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस व गारपिटीने घाला घातला आहे. त्यामुळे पार मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हा निधी आधार देणारा ठरेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होईल.