अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना कर्नल मानांकन प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 07:52 PM2018-05-21T19:52:12+5:302018-05-21T19:52:12+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना एनसीसीतर्फे मानद कर्नल मानांकन ससन्मान प्रदान करण्यात आले.
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना एनसीसीतर्फे मानद कर्नल मानांकन ससन्मान प्रदान करण्यात आले. विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात एन.सी.सी. ग्रुप हेडक्वॉर्टरचे ब्रिगेडिअर संजीव यादव यांनी प्रमाणपत्र व बॅटन देऊन कुलगुरूंना सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख यांची उपस्थिती होती.
मानद कर्नल मानांकन स्वीकारल्यानंतर कुलगुरूंनी सर्वप्रथम भारत सरकारचे आभार मानले. ते म्हणाले, महाराष्ट्र एन.सी.सी.ने पंधरापेक्षा अधिक वेळा मानाचे पंतप्रधान बॅनर पटकावून विजयाची पताका सातत्याने पुढे नेली आहे. युवकांमध्ये चारित्र्य, शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारीचे भान विकसित करून साहस वाढविणे, हा उद्देश एन.सी.सी.चा असला तरी देशाच्या सैनिकी सेवेची बीजे त्याच्या मनात रूजविण्याचे काम सातत्याने केले जात आहे. याशिवाय प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, नियमितता, सहकार्याची भावना, त्याग आदी गुण त्यांच्यात रूजविले जातात, असेही कुलगुरू म्हणाले.
सुरूवातीला कुलगुरूंना एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविकेतून कुलसचिव अजय देशमुख यांनी कुलगुरूंच्या सर्वांगीण कार्यावर व उपलब्धीवर प्रकाश टाकला. कर्नल व्ही. रिचर्ड यांनी संजीव यादव यांचा परिचय करून दिला. संचालन नीरज घनवटे यांनी आभार क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक अविनाश असनारे यांनी मानले. कार्यक्रमाला पदमाताई चांदेकर, उच्च शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, डी.डब्ल्यू. निचित, अधिष्ठाता स्मिता देशमुख, मनीषा काळे, वित्त व लेखा अधिकारी शशीकांत आस्वले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक मोहन खेरडे, एन.सी.सी. चे कर्नल विक्रम करांडे, कर्नल व्ही. रवी राव, कॅप्टन शीला मॅथ्यूज आदी उपस्थित होते.