राहुल गांधींविरोधात चिथावणीखोर वक्तव्य; अनिल बोंडेंविरुद्ध काँग्रेसजन संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:07 AM2024-09-19T11:07:26+5:302024-09-19T11:08:16+5:30
काँग्रेसची पोलिस आयुक्तालयावर धडक : चार तास ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत काँग्रेसने बुधवारी शहर पोलिस आयुक्तालयावर धडक दिली. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात संतप्त काँग्रेसींनी सुमारे चार तास ठिय्या दिला.
खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजापेठ पोलिसांनी खा. बोंडेंविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी पोलिस आयुक्तालयाची पायरी उतरले. खा. अनिल बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत खासदार आमदारांसह काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालय गाठले. तथा आयुक्तांना गराडा घातला. निवेदनानंतर लगेचच गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आल्याने आ. यशोमती ठाकूर व पोलिस यंत्रणेमध्ये शाब्दिक चकमकही झाली. गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असे बजावत काँग्रेसजण कार्यालयातच बसून राहिले. त्यामुळे तीनही पोलिस उपायुक्तांसह सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखेचे दोन्ही प्रमुख, वाहतूक व महिला सेलच्या निरीक्षक आदींनी सीपींचे कार्यालय गाठले. क्युआरटीला देखील पाचारण करण्यात आले. दुपारी ४ च्या आसपास एनसीआर दाखल झाल्यानंतर काँग्रेस जणांनी सीपी कार्यालय सोडले.
खासदार बोंडे यांना तत्काळ अटक करा
बोंडे यांनी केलेले विधान फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयल ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी पोलिस आयुक्तांना गराडा घालत केली. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा बोंडे यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. यावेळी हरीष मोरे, हरिभाऊ मोहोड, भैया पवार, प्रवीण मनोहर, अमित गावंडे, वैभव देशमुख, शैलेश काळबांडे, जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, शोभा शिंदे, बंडू हिवसेंसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.