चिथावणीखोर वक्तव्य; पालघरच्या स्वामीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:32 AM2023-05-22T08:32:19+5:302023-05-22T08:32:26+5:30
गोवंश संरक्षण यात्रेतील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गोवंश संरक्षण यात्रेदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पालघर येथील हिंदू शक्तिपीठाचे स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्याविरुद्ध २० मे रोजी रात्री भादंविचे कलम १५३ अ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्या भाषणामुळे दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन एकमेकांविरुद्ध क्रोध निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी स्वत: ही फिर्याद दाखल केली.
सकल हिंदू समाजाच्या वतीने १४ मे रोजी सायंकाळी स्थानिक गांधी चौक ते इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरापर्यंत गोवंश संरक्षण यात्रा काढण्यात आली. यात खासदारांसह अनेक राजकीय पदाधिकारी सहभागी झाले. तेथे स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराजांनी भाषण केले. त्यांनी भाषणाची सुरुवातच आक्षेपार्ह शब्दांनी केली. भाषणादरम्यान दोन धर्मांमध्ये, समाजामध्ये शत्रुत्व वाढून सामाजिक एकोपा भंग होईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केले.
विशिष्ट धर्माविरुद्ध एकजुटीचे आवाहन
पालघर येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी भाषणादरम्यान विशिष्ट धर्माविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.
अशा भाषणामुळे दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन, एकमेकांविरुद्ध क्रोध निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे चोरमले यांनी नमूद केले आहे.