मोर्शीच्या कोविड तपासणी केंद्रात निकटवर्तीयांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:13 AM2021-04-14T04:13:05+5:302021-04-14T04:13:05+5:30
मोर्शी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड तपासणी केंद्रावर वरिष्ठांचे लक्ष नाही. त्याचा फायदा घेत कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार ...
मोर्शी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या कोविड तपासणी केंद्रावर वरिष्ठांचे लक्ष नाही. त्याचा फायदा घेत कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार हाकला जात आहे. निकटवर्तीयांची चाचणी केली जाते, तर अनोळखी रुग्णांची टेस्ट किट नसल्याचे सांगून बोळवण केली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी मोर्शीकर करीत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाते. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाग्रस्त वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे थोडे जरी आजारपण वाटले तर कोरोना चाचणी करण्यास वैद्यकीय मंडळीकडून सांगितले जाते. आजारी व्यक्तीसुद्धा झटपट अहवालाकरिता रॅपिड अँटिजेन चाचणी करतात. परंतु, मोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड तपासणी केंद्रावर त्याकरिता किट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वी शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती, त्यावेळीसुद्धा किट संपल्याचे सांगितले गेले. मात्र, अमरावती येथे चौकशी केल्यानंतर किट असल्याचे सांगण्यात आले होते.
------
वरिष्ठांचा नो रिस्पॉन्स
किट उपलब्धतेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक, ग्रामीण आरोग्य अधीक्षक यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता, काहींचे फोन बंद होते, तर काहींनी कॉल रिसिव्ह केला नाही.