अमरावती जिल्ह्यात स्थापित होणार पीएसए प्लांट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:49+5:302021-06-06T04:09:49+5:30
सुनील चौरसिया अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रेशन स्विंग ॲब्सॉर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट ...
सुनील चौरसिया अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रेशन स्विंग ॲब्सॉर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट लावले जाणार आहेत. यामुळे दरदिवशी सुमारे ६६९ सिलिंडर एवढे ऑक्सिजन प्राप्त होऊ शकेल.
जिल्ह्यात दररोज दोन हजार सिलिंडरची मागणी असल्याने ऑक्सिजन गॅस बाहेरून बोलावला जात आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडून पीएसए प्लांट स्थापित करण्यात येणार आहेत. त्यावर सुमारे आठ कोटी रुपये खर्च होणार आहेत. अमरावतीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन तसेच अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर, धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक पीएसए प्लांटची उभारणी होत आहे. जूनच्या अखेरीस वा जुलैच्या प्रारंभी यापैकी आठ प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.
-------------
नायट्रोजनने तयार होईल ऑक्सिजन गॅस
पीएसए प्लांटमध्ये वातावरणातील नायट्रोजनयुक्त हवा शोषून घेतली जाईल. प्रक्रियेअंती ही हवा ऑक्सिजनमध्ये परिवर्तित होऊन थेट रुग्णालयांच्या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेतून पुरविली जाईल. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर साठवणुकीचा खर्च वाचणार आहे.
-----------
अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अखंडित पुरवठ्यासाठी पीएसए प्लांटची उभारणी होत आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती