सोरायसिस : प्रतिबंध हाच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:29 PM2018-10-28T22:29:28+5:302018-10-28T22:30:32+5:30

सोरायसिस हा त्वचारोग प्रामुख्याने पूर्व विदर्भाची ओळख होती. त्याच्या सीमा ओलांडून हा आजार झपाट्याने पसरत चालला आहे. तो जीवघेणा नसला तरी प्रचंड वेदना आणि कुरुपता प्रदान करणारा आहे. त्याचे गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने २९ आॅक्टोबर हा दिवस सोरायसिस दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी या आजारावर जनजागृती व वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

Psoriasis: Prevention of Prevention | सोरायसिस : प्रतिबंध हाच उपचार

सोरायसिस : प्रतिबंध हाच उपचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोरायसिस हा त्वचारोग प्रामुख्याने पूर्व विदर्भाची ओळख होती. त्याच्या सीमा ओलांडून हा आजार झपाट्याने पसरत चालला आहे. तो जीवघेणा नसला तरी प्रचंड वेदना आणि कुरुपता प्रदान करणारा आहे. त्याचे गांभीर्य ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने २९ आॅक्टोबर हा दिवस सोरायसिस दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी या आजारावर जनजागृती व वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
सोरायसिसवर प्रभावी उपचार करण्यासाठी आवश्यक संयुक्त उपचार पद्धत विकसित झाली आहे. त्वचेची जाडी व पापुद्रे कमी करण्यासाठी विविध आॅइनमेंट्स, तेल, लोशन आज उपलब्ध आहेत. या उपचारांबरोबरच सूर्यकिरणोपचार वा अल्ट्राव्हायोलेट किरणोपचार तसेच अत्याधुनिक टार्गेटेड फोटोथेरपी हे उपचारही उपयुक्त ठरतात. नॅरो बँड अल्ट्राव्हायोलेट किरणोपचार अतिशय सुरक्षित आणि प्रभावी उपचार आहेत.
सोरायसिसचे आठ प्रकार
सोरायसिसचे आठ प्रकार आहेत. प्लाक सोरायसिसमध्ये संपूर्ण शरीरावर मोठे आकाराचे चट्टे येतात. त्वचा जाड व कोरडी होते. खूप खाज येते. पांढरा कोंडा भरपूर पडतो हाताचे कोपर, गुडघा अशा सांध्यांभोवती हा प्रकार सर्वात जास्त आढळून येतो. गटेट सोरायसिसमध्ये संपूर्ण शरीरावर छोट्या-छोट्या थेंबाप्रमाणे चट्टे असतात. त्यांना खाज आणि कोंडाही कमी असतो. रोगाची सुरुवात पाठ छातीपासून होते. पस्टुलर सोरायसिसमध्ये संपूर्ण शरीरावर पू वा पाणी भरलेले लहान पुरळ दिसतात. इन्व्हर्स सोरायसिसमध्ये रोगाची सुरवात सांध्याच्या खोबणीत होते. काख व इतर झाकून राहणाऱ्या या भागांमध्ये त्वचेला जास्त प्रमाणात सूज येते व खवलेही पडतात. अशा जागांमध्ये सतत घाम येतो व तो पुसला न गेल्यामुळे तो भाग ओलसर राहतो. डोक्याच्या सोरायसिसमध्ये फक्त डोक्यावरच लालसर चट्टे येतात व त्यावर पांढरे खवले असतात. नखाच्या सोरायसिसमध्ये रुग्णांची नखे काळीनिळी पडतात व वेडीवाकडी होतात. पाल्मोप्लॅटर सोरायसिस फक्त तळहात व तळपायावर होतो. अखेरचा आजार हा सोरायटिक आर्थरायटिस आहे. सोरायसिस रुग्णांना संधिवात होतो, त्याचे हे वैद्यकीय नाव आहे.
सोरायटिक आर्थरायटिस घातक
सोरायसिसची लागण असलेल्या आर्थरायटिस रुग्णांच्या शरीरातील सांध्यांना सूज येऊ लागते. पायाचा अंगठा, हाताचे बोट अशा लहान सांध्यांपासून सुरुवात होते. सांधे पूर्णपणे झिजतात. हातापायाची बोटे वाकडी होतात. सांधे चिकटतात व कायमस्वरूपी निकामी होतात.
काय आहे सोरायसिस?
सोरायसिस हा एक त्वचारोग आहे. इतर त्वचारोगासारखाच सुरुवातीला वाटणारा, मात्र वेळीच योग्य उपचार न केल्यास प्रसंगी गंभीर परिणाम होऊ शकतात. डोक्यावरील, त्वचा, गुडघे, कोपर, कंबर, पाठ, कानामागे सुरुवातीला सोरायसिसचे चट्टे दिसू लागतात. नंतर ते वाढत जातात. यात त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन प्रचंड खाज सुटते व जाड होते. सफेद चंदेरी रंगाचे खवले सैलसर चिकटलेले असतात. ते जास्त प्रमाणात खाजवल्या नंतर भुशाप्रमाणे खाली पडतात. त्वचेच्या बाह्यपेशीत फारच जलद विभाजन झाल्याने त्वचा जाड होते. पातळ पापुद्राप्रमाणे खवले निघतात.
का होतो सोरायसिस?
रक्तातील पांढऱ्या पेशींपैकी ‘टी’ लिम्फोसाइटमध्ये काही बदलांचा परिणाम त्वचेच्या स्तरांमधील पेशींमध्ये होतो. यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा कमी वेळ लागतो व खवल्यांप्रमाणे जाडीभरडी त्वचा तयार होऊन लालसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसू लागतात. चट्ट्यांवर रूपेरी पांढरे पापुद्रेही येतात. या आजाराच्या सात ते 33 टक्के रुग्णांच्या नातेवाइकांना सोरायसिस असू शकतो.
जखमांना जपा
सोरायसिस आटोक्यात ठेवण्यासाठी ताणतणाव कमी करा. योगासन, प्राणायाम हे प्रकार खूप फायदेशीर ठरू शकतात. दारू, सिगरेट व तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहा. ज्या-ज्या ठिकाणी त्वचेला इजा पोहोचते, तिथे हा आजार असण्याची आणि पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते.

सोरायसिस हा रोग संसर्गजन्य नाही. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे हा रोग होतो. त्यापासून जिवाला काही धोका नाही.
- डॉ. वीरेंद्र सावजी, डर्मेटिलॉजिस्ट, चर्मरोग विभाग, पीडीएमसी

Web Title: Psoriasis: Prevention of Prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.