‘त्या’ सायको क्रिमिनल’कडून फ्रेजरपुऱ्यातील गुन्ह्याची कबुली, मुद्देमालही जप्त
By प्रदीप भाकरे | Published: August 21, 2023 06:12 PM2023-08-21T18:12:48+5:302023-08-21T18:13:26+5:30
आरोपीची प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळी मोड्स ऑपरेंडी
अमरावती : राजापेठ पोलिसांनी अंबाविहार व गंगोत्री कॉलनीतील जबरी चोरीप्रकरणी अटक केलेल्या मनीष अनिल जोशी या ‘सायको क्रिमिनल’ने फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याला प्रोडक्शन वारंटने फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. त्याचेकडून त्या गुन्ह्यातील १२.५ ग्रॅम सोने देखील हस्तगत करण्यात आले आहे.
गेल्या चार पाच वर्षांपासून शहरात जबरी चोरी करणारा मनीष जोशी (३०, रा. पार्वतीनगर नं.३) हा अद्यापही पोलीस रेकॉर्डवर आला नव्हता. मात्र राजापेठ पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने पीसीआरदरम्यान राजापेठ येथील पाच, फ्रेजरपुरा येथील तीन व खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात नोंद एक अशा एकुण नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात फ्रेजरपुऱ्यातील विना गायकवाड यांच्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात आरोपी जोशीला सोमवारी अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी ही कारवाई केली.
काय होते प्रकरण१५ एप्रिल रोजी उत्तमनगर येथील विना गायकवाड या स्वत:कडील जुने वापरते सोन्याचे दागदागिने एका पिशवीत ठेऊन मोतीनगर परिसरातील सराफा दुकानात गहाण ठेवण्याकरीता गेल्या. दुकान बंद असल्याने त्या घराकडे पायदळ येत असतांना यशोदानगर चौकात दुचाकी स्वाराने त्यांना थांबविले. आपण पापड व्यवसायिक असल्याचे सांगून त्यांना पापड लाटण्याचे कामाकरीता आठ हजार रुपये रूपये महिना देण्याची बतावणी केली. तथा त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जात असल्याचे सांगत दुचाकीवर बसविले. तथा कलोतीनगर येथे निर्जन स्थळी नेऊन जबरीने त्यांच्या हातातील दागिने असलेली पिशवी हिसकावून तो तेथून पळून गेला. तो भामटा मनीष जोशी असल्याचे आता स्पष्ट झाले.