राष्ट्रसंताच्या कर्मभूमीत ॲम्ब्युलन्सच्या भेसूर आवाजाचा "सायकॉलॉजिकल इफेक्ट"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:08+5:302021-04-15T04:12:08+5:30
कोविडचे जीवघेणे थैमान नागपूर, अमरावतीसारख्या लाखोंच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरांत रोरावत आहे. त्याच्या तुलनेत ग्रामीण भागातील जीवनमान आजही सुरक्षित ...
कोविडचे जीवघेणे थैमान नागपूर, अमरावतीसारख्या लाखोंच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहरांत रोरावत आहे. त्याच्या तुलनेत ग्रामीण भागातील जीवनमान आजही सुरक्षित असल्याचे दिसते. पण, वाढती रुग्णसंख्या आणि त्यांच्या उपचाराकरिता सुरू असलेली ॲम्ब्युलन्सच्या भेसूर सायरनच्या माध्यमातून सुरू असलेली धावपळ अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविते. आधीच प्रचंड धास्तीमध्ये जीवमान व्यथित करीत असलेली जनता स्वतःला सुरक्षित समजण्यासाठी आध्यत्मिक बळ एकवटून दिवस घालवत आहेत. गुरुकुंज आश्रमाच्या सान्निध्यातील गुरुदेवनगर, मोझरी ही दोन्ही जुळी गावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या पावन पदस्पर्शाने पुनित झाली आहेत. या गावांमध्ये फारसे तंटे, भांडणे नाहीत. त्यामुळे आठ गावांची सुरक्षा असलेली गावपातळीवर जिल्ह्यातील सर्वाधिक देखणी पोलीस चौकी आजही पोलीस कर्मचाऱ्यांविना प्रासंगिक कार्यासाठी जणू तिचे निर्माण केले आहे, अशा आर्त भावात उभी आहे. कोरोनामुळे शहरात गेलेले अनेक गावकरी आश्रम परिसरातील आध्यत्मिक वातावरण जवळून अनुभवण्यासाठी गावात परतली आहेत. दररोज पहाटे ५ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मूळ आवाजातील भजनांनी येथील गावकऱ्यांची पहाट उगवते. मंजुळ आध्यात्मिक वातावरणामुळे कोरोना संकट काहीसे थिटे वाटते. त्यामुळे सामान्य लोक बंदद्वार महासमाधी व प्रार्थना मंदिरासमोरच नतमस्तक होतात. पण, अशातच मागील काही दिवसात येथील राष्ट्रीय महामार्गावरून ॲम्ब्युलन्सचा वावर अचानक वाढला. दररोज शेकडो रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स लक्ष वेधून घेतात आणि सायरन जिवाचा थरकाप उडवितो. त्याचा ‘सायकॉलॉजिकल इफेक्ट’ जर्जर मनावर होतो. गावातील कुणी रुग्ण नेण्यात आला असेल का, अशी चर्चा होते. कोविडच्या थैमानाने धास्तावलेली जनता प्रचंड बेजार आहे. तेव्हा नागरी वस्तीतून मार्गक्रमण करीत असताना ॲम्ब्युलन्स चालकांना सायरन बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.