पायी रॅलीतून ‘स्मार्ट सिटी’बाबत जनजागृती

By admin | Published: November 30, 2015 12:26 AM2015-11-30T00:26:29+5:302015-11-30T00:26:29+5:30

महानगरपालिकेद्वारे स्वच्छ भारत, पर्यावरण जागरुकता, ‘स्मार्ट सिटी’बाबत सामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पायी रॅली (वॉकेथॉन) रविवारी काढण्यात आली.

Public awareness about 'smart city' on foot rally | पायी रॅलीतून ‘स्मार्ट सिटी’बाबत जनजागृती

पायी रॅलीतून ‘स्मार्ट सिटी’बाबत जनजागृती

Next

जिल्हा क्रीडा संकुलात सांगता : विशेष प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आवाहन
अमरावती : महानगरपालिकेद्वारे स्वच्छ भारत, पर्यावरण जागरुकता, ‘स्मार्ट सिटी’बाबत सामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी पायी रॅली (वॉकेथॉन) रविवारी काढण्यात आली.
जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा, आ. सुनील देशमुख, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदींनी हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली महापालिका मुख्य कार्यालयापासून राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक), जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅलीत पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता प्रकाश बनसोड, अविनाश मार्डीकर, उपआयुक्त विनायक औघड, चंदन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रास्ताविक करताना महापालिका आयुक्तांनी ‘ग्रीन सिटी’ अमरावतीला ‘क्लीन सिटी’ बनवायचे आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. या दिशेने प्रयत्न करणाऱ्या काही गणमान्यांचा गौरव करण्यात येईल, असेही यावेळी बोलताना महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले.

हागणदारीमुक्तीचे ध्येय
अमरावती : अमरावती शहर हागणदारीमुक्तीचा मानस त्यांनी व्यक्त केला. मनपातर्फे शासनाच्या सहकार्याने शौचालय बांधणीसाठी आर्थिक मदत केली जात आहे. शहरात ज्या कुटुंबाकडे शौचालय नसेल त्यांना शौचालय बांधण्यासाठी १७ हजार रुपये दिले जाणार आहेत.
या कार्यक्रमात शहरातील निसर्ग प्रेम मधु घारड, प्रेमकुमार गुप्ता, शंकर कुटारिया, पुरुषोत्तम कुमरे दत्ता धर्माळे, लप्पीसेठ जाजोदिया, नंदकिशोर गांधी, मानवेंद्र देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील स्वच्छतेसाठी भागीरथ ढेणवाल, तारा गोहर, अनिल धनस्कर, इंदु चव्हाण, श्रीहरी महिला बचतगट, स्वतंत्र सफाई कामगार नागरिक सेवा सहकारी संस्था यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रत्येक नागरिकांनी स्मार्ट होणे आवश्यक आहे. नागरिक स्मार्ट झाले की शहरही स्मार्ट होण्यास वेळ लागणार नाही. अमरावती शहराला स्मार्ट सिटी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शहर चांगले राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जागतिक पातळीवर आपल्या शहराची नाव झाले आहे. मनपा प्रशासनाला जिल्हा प्रशासनाच नेहमीच सहकार्य राहणार, असे ते म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी अमरावती शहर हे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. मनपा प्रशासनाने सर्व नागरिकांना यात समाविष्ठ करून घ्यावे. मॅरेथॉन, सायकल रॅली यासारखे उपक्रम राबवावे. शहरातील विविध सामाजिक संघटनेला यात समाविष्ट करावे, अमरावतीतील नागरिकांनी यात सहभाग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
आमदार सुनील देशमुख यांनी यावेळी ही रॅली आयोजित केल्याबद्दल मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकारी अमरावती शहरात बदली झाल्यास अमरावती शहरात येण्यास उत्सुक नसतात. पण ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचा समज हा दूर होऊन जातो. अमरावती शहर हे सुंदर शहर आहे. अनेक शहरापेक्षा जास्त विकास अमरावतीचा झाला आहे. प्रत्येकाने अमरावती माझी आहे ही भावना ठेवली पाहिजे. अमरावती शहर हे स्मार्ट सिटी बनविण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. अमरावती मनपाला शासन स्तरावर सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. नितीन गडकरी यांनी अमरावती शहरातील मुख्य रस्ते काँक्रीटीकरणाचे करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
संचालन मदन तांबेकर यांनी तर आभार प्रदर्शन स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी केले. या रॅलीत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, झोन सभापती मिलिंद बांबल, शहर सुधार समिती सभापती भूषण बनसोड, महिला व बालकल्याण समिती सभापती संगिता वाघ, नगरसेवक दिनेश बुब, सुनील काळे, हमीद शद्दा, राजू मसराम, नीलिमा काळे, सुजाता झाडे, स्वप्ना ठाकूर, नूतन भुजाडे, राजेंद्र महल्ले, जावेद मेमन तसेच संजय तिरथकर, प्रणय कुळकर्णी, पंजाबराव तायवाडे उपस्थित होते. या रॅलीत एचव्हीपीएमचे विद्यार्थी, होलीक्रॉस शाळेचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, अनेक शाळेचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Public awareness about 'smart city' on foot rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.