वने, वन्यजीव, जैवविविधतांच्या संवर्धनासाठी होणार जनजागृती; ३७ कोटी १७ लाखांचा खर्च
By गणेश वासनिक | Published: February 16, 2024 05:46 PM2024-02-16T17:46:05+5:302024-02-16T17:46:40+5:30
Amravati: वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन आणि वनक्षेत्र, वन आच्छादन वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने प्रचार, प्रसार व प्रशिक्षणावर भर दिला असून, या आर्थिक वर्षात ३७ कोटी १७ लाख ८७ हजार ४४६ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती - वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन आणि वनक्षेत्र, वन आच्छादन वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्याकरिता शासनाने प्रचार, प्रसार व प्रशिक्षणावर भर दिला असून, या आर्थिक वर्षात ३७ कोटी १७ लाख ८७ हजार ४४६ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जागतिक तापमानातील बदल, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय बदलांमुळे वने, वन्यजीव, जैवविविधता यांचे संरक्षण, संवर्धन, व्यवस्थापन यासंदर्भात जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवून विचार मंथन केले जाणार आहे. महसूल व वनविभागाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी या विषयाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. यात प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक मीडिया, बस, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीची साधने, सार्वजनिक ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. तसेच चित्रफिती, लहान स्वरूपातील चित्रपट, लेख, भित्तीचित्रे आदींद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शासनाच्या विविध वेबसाइट, सोशल मीडिया यावर वने आणि पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची कामे, योजना, निर्णयाची माहिती प्रसारित केली जाणार आहे. सन २०२३-२४ या वर्षात प्रचार, प्रसारासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ही संकल्पना आहे.
या बाबींवर असेल भर
- प्रिंट क्रिएटिव्ह निर्मिती व ॲडॅप्टेशन, टीव्हीसी, ऑडिओ जिंगल आणि स्पॉट, लघुपट, माहितीपट आणि यशोगाथा निर्मितीसाठी ५ कोटी ५७ लाख ४० हजारांचा खर्च प्रस्तावित आहे.
- वृत्तपत्रांमध्ये जाहिरात, मेट्रो शहरात होर्डिंग्ज, विमानतळावर प्रसिद्धी, नागपूर, पुणे, मुंबई सिटी बस क्यू शेल्टर, लोकल केबल, डिस्प्ले, समाजमाध्यम, आकाशवाणी, खासगी एफ. एम. वाहिन्या, ट्रेन रॅप, पुरस्कार सोहळ्यासाठी १७ कोटी ६८ लाख ६ हजारांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
- वनमंत्री यांची वनविषयक मुुलाखत, दृक-श्राव्य प्रसारण, वन्यजीव आणि वन विभागाशी संबंधित माहितीपट, विमानतळावर कायमचे डिजिटल बोर्ड, डिस्प्ले, डिजिटल ग्रंथालय निर्मिती, वन गीत, ईको क्लब व प्रतिज्ञा, वृक्ष उत्पादन आणि वृक्ष खरेदीदारांचा मेळावा, जागतिक वनदिनानिमित्त विविध आयोजन, प्रशिक्षण, चंद्रपूर व मूल बसस्थानकावर वने व वन्यजीव यासंदर्भात रंगरंगाेटी, फार्म ट्री व कृषी वानकी ॲप, मंत्रालयात थ्रीडी आणि प्रदर्शन, ताडोबा महाेत्सवासाठी १३ कोटी ९२ लाख ४० हजार ६४६ रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.