स्वामिनाथन आयोगासाठी लग्नपत्रिकेतून जनजागृती
By Admin | Published: May 14, 2017 12:12 AM2017-05-14T00:12:10+5:302017-05-14T00:12:10+5:30
शेतकऱ्यांमध्ये या आयोगाबद्दल जागृती निर्माण करून, हा आयोग लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संवेदनशील व्हायला हवे,
पेठे कुटुंबाची लग्नपत्रिका : कर्जमाफ ीसाठी पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : शेतकऱ्यांमध्ये या आयोगाबद्दल जागृती निर्माण करून, हा आयोग लागू करण्यासाठी शेतकऱ्यांनी संवेदनशील व्हायला हवे, हे लग्नपत्रिकेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य तालुक्यातील खराळा येथील आनंदराव पेठे यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे ही लग्नपत्रिका वऱ्हाड्यांसाठीच नव्हे, तर तालुक्यात सर्वांकरिता चर्चेचा विषय ठरली आहे.
शेतकऱ्यांचे सर्वच प्रश्न देशभर गाजत आहेत. शेतमाल खरेदीच्या हमीभावातील खरेदीत तर शासन अक्षरश: हतबल झाले आहे. तरीही सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कायमस्वरुपी सुधारण्यासाठी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींचा स्वीकार करीत नाही. शासन शेतकऱ्यांची स्वामिनाथन आयोगा विषयीची अनास्था कारणीभूत असल्याचे दिसते. याचा विचार करूनच पेठे यांनी लग्नपत्रिकेद्वारे जनजागृती करण्याचा निश्चय केला आहे. शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी व पॅकेजची भीक घातल्यापेक्षा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून आर्थिक संपन्न करा, अशी मागणी केली आहे.
संतांचा दाखला
तुकाराम महाराजांनी सर्वप्रथम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज खाते इंद्रायणीत बुडवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. तसेच राष्ट्रसंतांचा प्रसन्न हवा पाणी ऋुती, हाची लग्नाचा मुहूर्त. बाकी झंजट फालतू, समजतो आम्ही हा लग्न मुहुर्ताचा संदेशही दिला. पत्रिकेच्या पहिल्या पानावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासही छापायला पेठे कुटुंब विसरले नाहीत.