फायनान्सच्या विळख्यात गोरगरीब जनता!
By admin | Published: November 21, 2015 12:13 AM2015-11-21T00:13:28+5:302015-11-21T00:13:28+5:30
शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ‘बेसिक’ ने मागील तीन वर्षांत तालुक्यातील आठ जणांचा बळी घेतला आहे़
४५ गावांमध्ये ‘बेसिक’चा व्याप : चक्रवाढ व्याज घेतेय गरिबांचा जीव
धामणगाव रेल्वे : शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ‘बेसिक’ ने मागील तीन वर्षांत तालुक्यातील आठ जणांचा बळी घेतला आहे़ ४५ गावे या फायनान्सच्या विळख्यात अडकली असून चक्रवाढ व्याजामुळे गरिबांचे जीव जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
तालुक्यात महिला बचतगटांना विविध बँकेच्यावतीने प्रशासकीय अधिकारी कर्ज वितरण करीत असले तरी हे कर्ज मंजूर होण्यास अवधी लागतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात ‘फायनान्स’च्या माध्यमातून ‘बेसिक’ने डोके वर काढले आहे़
१० ते २० महिलांचा बचतगट तयार केल्यानंतर संबंधित कंपनी या बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देते़ दर आठवड्याला बाजाराच्या दुसऱ्या दिवशी वसुली केली जाते. सर्व महिलांनी दिलेल्या कर्जाचा हप्ता गोळा करून द्यावा, अशी अट या फायनान्स कंपनीची आहे़ प्रत्येक आठवड्याला यातील कर्मचारी घरी जाऊन पैसे वसुलीचे काम करतात़ एखाद्या महिलेने हप्ता कमी देण्याचा प्रयत्न केला तर संबंधित कर्मचारी हा हप्ता स्वीकारत नाहीत. सर्व महिला एकत्र येऊन या महिलेला कर्ज हप्ता वसूल करण्यासाठी बाध्य करतात़ यातूनच संबंधित महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कंपनीचे कर्मचारी करीत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
सावकारीपेक्षा दुप्पट वसुली
खासगी सावकार घरातील दागिने गहाण ठेवून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतात.परंतु मागील वर्षभरात सावकारांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न शासनाच्यावतीने सुरू झाल्यामुळे याचा फायदा फायनान्स कपंन्यांनी घेणे सुरू केले आहे़ छायाचित्र, रेशनकार्ड, आधार कार्ड, मतदान कार्डची झेरॉक्स प्रत आदी दस्तऐवज संबंधित गावातील कंपनीने नियुक्त केलेल्या एजन्टकडे दिली जातात.
ही कागदपत्रे घेतल्यानंतर सुपरवायझर एका फॉर्मवर पती-पत्नीची सही घेऊन १० ते १५ हजार रूपये कर्ज उपलब्ध करून देतात. कर्जवसुली व त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येत असल्याचे चित्र आहे.