धारणी न्यायालयाबाहेर लोकसंताप; शिवकुमारला घेरण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:31+5:302021-03-28T04:13:31+5:30

मुर्दाबादचे नारे : एसडीपीओंना घेराव, आरोपीची रात्र धारणीच्या कोठडीत धारणी (अमरावती) : आएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या ...

Public outcry outside the holding court; Trying to surround Shivkumar! | धारणी न्यायालयाबाहेर लोकसंताप; शिवकुमारला घेरण्याचा प्रयत्न!

धारणी न्यायालयाबाहेर लोकसंताप; शिवकुमारला घेरण्याचा प्रयत्न!

Next

मुर्दाबादचे नारे : एसडीपीओंना घेराव, आरोपीची रात्र धारणीच्या कोठडीत

धारणी (अमरावती) : आएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या डीएफओ विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच अनेक महिला वनकर्मचारी, अधिकारी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महिलांनी न्यायालयाबाहेर तोबागर्दी केली. त्या गर्दीला चेहरा नव्हता. होता तो केवळ शिवकुमारविषयीचा संताप. त्या संतापातूनच शिवकुमारला महिलांनी घेरण्याचा प्रयत्न केला. महिला प्रचंड संतापल्या होत्या. पोलिसांनादेखील त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखत पोलिसांनी शिवकुमारला सहिसलामत न्यायालयात आणले.

न्यायालयात नेण्यापूर्वी आरोपी शिवकुमार हा धारणी पोलीस ठाण्यात होता. तेथे वनविभागाच्या अधिकारी व महिला कर्मचारी पोहोचल्या. आरोपीला न्यायालयात पायदळ नेण्याची मागणी करत असताना त्यांची पोलिसांशी चांगलीच बाचाबाची झाली. आरोपीला ज्या वाहनातून न्यायालयात नेण्यात आले, त्याला घेराव घातला. महिला पोलिसांनी त्या महिलांना बाजूला करत आरोपीला न्यायालयात आणले. लगेच महिला वनाधिकारी कर्मचारी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय परिसरात धाव घेतली. तेथे आरएफओ शुभांगी डेहनकर, वनपाल प्रियंका येवतकर व वनरक्षक अनिता बेलसरे यांनी आरोपीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला मारण्याचा प्रयत्नदेखील झाला. मात्र पोलिसांमुळे त्यांचे हात आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाही.

न्यायालयाच्या प्रवेशद्वारसमोर आरोपीचा पोस्टर जाळण्यात आले. विनोद शिवकुमार मुर्दाबाद, त्याला फाशीची शिक्षा द्या, चपलांनी मारा, महिलांचा अपमान सहन करणार नाही. नारीशक्ती जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. नागरिकांनी न्यायालयाच्या परिसरात तारेच्या कुंपणाभोवती प्रचंड गर्दी केली होती. त्यांना पोलिसांनी हाकलून लावले. तरी पण नागरिकांनी घोषणा बाजी करत पुन्हा निकाल ऐकण्याकरिता व आरोपीला बघण्याकरिता प्रचंड गर्दी केली होती.

शिवकुमारविरोधात वनकर्मचारी एकवटले

सुसर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर, वन कर्मचारी प्रियंका शेवंतकर, प्रियंका खेरडे, राणी गरुड, अनिता बेलसरे या कर्मचारी अधिकाºयांनी न्यायालयाबाहेर आरोपी शिवकुमारविरू द्ध संताप व्यक्त केला. भाजपच्या क्षमा चौकशे, महिला संघटनेच्या वंदना जावरकर , वर्षा जैस्वाल, सामाजिक वनीकरण अधिकारी ठाकूर, भाजपचे आप्पा पाटील यांनी उपविभागीय अधिकारी संजय काळे, ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्याशी वाद घातला. विरोध करत आरोपीला घेरण्याचा प्रयत्न केला. एपीआय वर्षा खरसान, पीएसआय करुणा मोरे, पीएसआय रिना सरदार व महिला पोलिस कर्मचारी यांनी महिलांना घेरले. त्याच वेळी आरोपी विनोद शिवकुमार याला कव्हर करत पोलिसांनी वाहनात बसविले व न्यायालयात आणले.

------------------

Web Title: Public outcry outside the holding court; Trying to surround Shivkumar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.