सार्वजनिक ठिकाणी ‘गॅस बॉम्ब’चा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:24 PM2018-10-19T22:24:37+5:302018-10-19T22:25:12+5:30
फुग्याच्या गॅस सिलिंडर स्फोटाने हादरलेल्या राजकमल चौकातील घटनेनंतर आता सार्वजनिक ठिकाणचे ‘गॅस बॉम्ब’ अमरावतीकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. शुक्रवारी दुपारी नवाथे नगर चौकात एका हातगाडीवर सिलिंडरचा भडका उडाला. सुदैवाने हानी झाली नाही, मात्र, सार्वजनिक ठिकाणावरील ‘गॅस बॉम्ब’चा धोका कायम असल्याचे ही घटना अधोरेखित करीत आहे.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फुग्याच्या गॅस सिलिंडर स्फोटाने हादरलेल्या राजकमल चौकातील घटनेनंतर आता सार्वजनिक ठिकाणचे ‘गॅस बॉम्ब’ अमरावतीकरांसाठी धोकादायक ठरत आहेत. शुक्रवारी दुपारी नवाथे नगर चौकात एका हातगाडीवर सिलिंडरचा भडका उडाला. सुदैवाने हानी झाली नाही, मात्र, सार्वजनिक ठिकाणावरील ‘गॅस बॉम्ब’चा धोका कायम असल्याचे ही घटना अधोरेखित करीत आहे.
सार्वजनिक ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी शेकडोंच्या संख्येने हातगाड्यांवर गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र, हातगाडी चालक गॅस सिलिंडरच्या सुरक्षेविषयी नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. नेमकी हीच बाब नागरिकांसाठी जिवघेणी ठरू शकते. राजकमल चौकात फुग्याच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. दोन जण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेनंतर शहरातून आता गॅस भरणारे फुगेवाले दिसेनासे झाले आहेत. मात्र, आता परवानगीने चालणाऱ्या ‘गॅस बॉम्ब’ अर्थात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हजारो हातगाड्यांवर तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर केला जाते. मात्र, त्याच्या सुरक्षेविषयी कोणत्याही नियमावली पाळली जात नाही.
एकाही हातगाडीवर अग्निरोधी साहित्य नाही
सार्वजनिक ठिकाणी आग लागल्यास फायर एक्सटिंग्यूशर आदी अग्निरोधी साहित्याने आग नियंत्रणात येऊ शकते. मात्र, तशी सोय कोणतेही हातगाडीचालक करीत नाही. शहरातील एकाही हातगाडीवर अग्निरोधी साहित्य नसल्याचे दिसून येत आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचाही वापर
शहरातील अनेक हातगाड्यांवर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर अनेकदा पोलीस कारवाईचा बडगासुद्धा उगारला गेला आहे. मात्र, तरीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर सुरूच आहे.
गॅस सिलिंडरच्या सुरक्षेविषयीची जबाबदारी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाºयांची असते. त्यांनीच गॅस सिलिंडरच्या सुरक्षेविषयी मोहीम राबविणे आवश्यक आहे.
- भरतसिंग चव्हाण
अधीक्षक
आमच्याकडे गॅस सिलिंडरच्या ब्लॅक मार्केटिंगविषयी तक्रार आल्यास कारवाईची रुपरेषा ठरते. गॅस सिलिंडरच्या सुरक्षेची जबाबदारी ही संबंधित कंपनीच्या वितरकांची आहे.
- अनिल टाकसाळे
जिल्हा पुरवठा अधिकारी
आम्ही गॅस सिलिंडर तपासूनच देतो. ते वापरताना हातगाडी चालकांनी सुरक्षेवर लक्ष द्यायला हवे. गॅस नळी, लिकेज, शेगडी आदी व्यवस्थित आहे किंवा नाही, याची शहानिशा करावी. याशिवाय अग्निरोधक ठेवणे आवश्यक आहे.
- संजय देशमुख
अध्यक्ष, अमरावती गॅस डिस्ट्रिब्यूटर