सार्वजनिक स्वच्छतागृह, छे! ठेकेदारांचे गोडाऊनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:44 PM2018-02-04T22:44:29+5:302018-02-04T22:44:53+5:30
महापालिकेतील १६०० पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी उभारलेले स्वच्छतागृह कुलूपबंद करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेतील १६०० पेक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबविण्यासाठी उभारलेले स्वच्छतागृह कुलूपबंद करण्यात आले आहे. ते सार्वजनिक वापरासाठी खुले न करता तेथे संबंधित ठेकेदाराने बांधकाम सामग्री ठेवली आहे. त्यामुळे ते स्वच्छतागृह नव्हे तर ‘जुझर सैफी’चे गोडावून झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील अन्य स्वच्छतागृहांची दुरवस्था लक्षात घेता आधुनिक स्वच्छतागृह उभारणीचा संकल्प सोडण्यात आला. १७ लाखांपेक्षा अधिकचा खर्च करून अत्याधुनिक सामग्रीचा वापर करीत दुमजली स्वच्छतागृह उभारण्यात आले. त्यासाठी महापालिका आवारातील पाकिंगसाठी वापरण्यात येणारी जागा कंत्राटदार जुझर सैफीला दिली. फेब्रुवारीत बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र, शौचालय खुले न करता जुझर सैफी या कंत्राटदाराने त्यात अन्य कामासाठी वापरण्यात येणारे बांधकाम व लोखंडी साहित्य त्यात जमा करून ठेवली आहे. ते लाखो रूपयांचे साहित्य चोरीला जाऊ नये, यासाठी त्या शौचालयाला सायंकाळी कुलूप ठोकण्यात येते. सैफी यांनी या स्वच्छतागृहाला गोडाऊनचे रूप दिले आहे. या विस्तीर्ण अशा स्वच्छतागृह कम गोडावूनमध्ये लोखंडी सलाखा, सिमेंटची पोते, रॉड व इतर साहित्य ठेवले आहे. बांधकाम पूर्ण करूनही अनिवार्य बाब असलेले स्वच्छतागृह सुस्थितीत महापालिकेला हॅन्डओव्हर न करता त्याला गोडावूनचे स्वरूप मिळत असेल तर त्यावर बांधकाम विभागाचा असलेला वरदहस्त अधोरेखित होतो. सैफी महापालिका प्रशासनाला भाव देत नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाचे धाडस का होत नाही?
मालू इन्फ्रास्पेसने बेकायदेशीर युनिपोलवर जाहिराती झळकविल्या असताना त्यांना नोटीस पाठविण्याचे धारिष्ट्य प्रशासन करू शकले नाही. जुझर सैफी यांनीही महापालिकेच्या स्वच्छतागृहाचा खासगी वापर चालविला असताना त्यांना विचारणा करण्याची हिंमत बांधकाम विभाग करू शकला नाही. मालू इन्फ्रास्पेस प्रमाणेच जुझर सैफी यांच्यावर असलेले प्रशासनाचे प्रेम यानिमित्ताने जगजाहीर झाले आहे. तथापि, कारवाई करण्यास प्रशासन का धजावत नाही, हे मात्र अनुत्तरित आहे.