वनविभागात लोकसेवा हमी कायदा अंमलबजावणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:33 PM2018-03-25T23:33:11+5:302018-03-25T23:33:11+5:30
वनविभागाने लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याचे निर्देश महसूल व वनविभागाचे सहसचिवांनी दिले आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वनविभागाने लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावण्याचे निर्देश महसूल व वनविभागाचे सहसचिवांनी दिले आहे.
‘वनविभागाने लोकसेवा हमी कायदा गुंडाळला’ यासंदर्भात ‘लोकमत’ने २२ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वनविभागाने सेवा हमी कायद्यासंदर्भात अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईबाबत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र लोकसेवा हमी अध्यादेश २०१५ मधील कलम ३ चे पोट कलम (१) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागामार्फत प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांनी पात्र व्यक्तींना देण्यात येणाºया लोकसेवा आणि अध्यादेशानुसार लोकसेवा देण्याकरिता विहित कालमर्यादेसह प्रथम आणि द्वितीय अपील अधिकारी नियुक्त करण्याचे कळविले आहे. लोकसेवा कायद्यांतर्गत सेवा मिळविण्यासाठी वनविभागाने वेब पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह लोकसेवांसाठी आॅनलाइन अर्ज देता येणार आहे.
अधिसूचनेनुसार लोकसेवा कायद्याची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. अधिसूचनेनुसार प्रथम व द्वितीय प्राधिकाऱ्यांकडे जबाबदारीदेखील सोपविल्याचे अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
हे आहेत प्रथम अपील प्राधिकारी
शासन अधिसूचेनुसार वनविभागाने प्रथम अपील प्राधिकारी म्हणून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, वनसंरक्षक (वन्यजीव), विभागीय व्यवस्थापक (वनप्रकल्प), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), जिल्हाधिकारी (महाराष्ट्र वृक्षतोड विनियमन, अधिनियम) यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे.