'पीडीएमसी'त रंगले 'रुजू नाट्य'
By admin | Published: April 5, 2015 12:14 AM2015-04-05T00:14:45+5:302015-04-05T00:14:45+5:30
डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी हे शनिवारी अधिष्ठातापदी रुजू होण्यासाठी महाविद्यालयात गेले असता..
दिलीप जाणे म्हणतात, मीच 'डीन'
पद्माकर सोमवंशींना परत पाठविले
अमरावती : डॉ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता पद्माकर सोमवंशी हे शनिवारी अधिष्ठातापदी रुजू होण्यासाठी महाविद्यालयात गेले असता कार्यरत अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी त्यांना आल्यापावली परत पाठविले. पीडीएमसीत रंगलेल्या 'रुजू नाट्य' प्रकरणाची खमंग चर्चा शिवाजी शिक्षण संस्थेत आहे.
जाणे यांच्यापूर्वी पद्माकर सोमवंशी हे डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. त्यांच्या टेबलाच्या कपाटातून कोट्यवधी रुपयांची रोकड प्राप्तीकर विभागाला आढळून आली होती. त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेने सोमवंशी यांची चौकशी आरंभली होती. विशेष चौकशी पथकाद्वारे ही चौकशी सुरू असतानाच सोमवंशी यांना संस्थेने बडतर्फ केले. या निर्णयाविरुध्द सोमवंशी यांनी आरोग्य विद्यापीठाकडे दाद मागितली. सोमवंशी यांना रूजू करून घेण्याचे आदेश विद्यापीठाने दिले होते. शिवाजी शिक्षण संस्थेने विद्यापीठाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी नाशिक आरोेग्य विद्यापीठाचे आदेश ग्राह्य धरावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. त्याअनुषंगाने आरोग्य विद्यापीठाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून सोमवंशी यांच्या बाजूने निकाल दिला. सोमवंशी यांच्या बडतर्फीचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. त्यांना पूर्वपदी रुजू करुन सात वर्षांचे वेतन अदा करण्यात यावे, असा निर्णय विद्यापीठाने दिला. १७ मार्च रोजी सदर आदेश जारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार शनिवारी सोमवंशी वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होण्यासाठी दाखल झाले; तथापि, असा कुठलाही आदेश मला प्राप्त झालेला नाही, अशी भूमिका घेऊन प्रभारी अधिष्ठाता दिलीप जाणे यांनी सोमवंशी यांच्याकडे पदभार सोपविण्यास नकार दिला.
आरोग्य विद्यापीठाच्या निर्णयावरुन मी अधिष्ठातापदी रुजू होण्यासाठी गेलो होतो. मात्र, प्रभारी अधिष्ठाता यांना संस्थेने कळविले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता वैधानिक मार्गाने न्याय मागावा लागेल.
- पद्माकर सोमवंशी,
माजी अधिष्ठाता, पीडीएमसी.
आम्ही संस्थेच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला होता. डीनला काढायचे असेल तर सरळ-सरळ काढूनच टाका, असेही सुचविले होते. सोमवंशी यांच्याकडून दोनदा निर्णय देण्यात आला आहे. संस्था उगीचच वेळ दवडत आहे. शैक्षणिक क्षेत्रावर त्यामुळे विपरित परिणाम झाला आहे.
-दिलीप इंगोले,
माजी उपाध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्था.
सोमवंशी हे नियमबाह्यरीत्या रुजू होण्यासाठी आले होते. त्यांना अद्यापपर्यंत आदेश प्राप्त झालेला नाही. त्यांना आदेश मिळेपर्यंत अधिष्ठातापद मीच सांभाळणार आहे.
-दिलीप जाणे,
प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता.