तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
By admin | Published: December 3, 2015 12:16 AM2015-12-03T00:16:26+5:302015-12-03T00:16:26+5:30
कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांचे सर्वेक्षणामध्ये तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या (हेलिकोव्हर्पा) या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
नवे संकट : किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे
अमरावती : कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांचे सर्वेक्षणामध्ये तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या (हेलिकोव्हर्पा) या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे हा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने किडीचे व्यवस्थापन करने गरजेचे आहे.
जिल्ह्यात आंतरपीक म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीचे पिक घेतल्या जाते. यंदाच्या हंगामात ९८ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रात तुरीचे पिक आहे. खरीपाचे सोयाबीन पावसाअभावी उध्वस्त झाले. कपाशीवर लाल्याचा प्रकोप आहे. अशास्थितीत तूर पिकाची आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र वातावरणातील बदल, वाढलेले उष्ण तापमान व थंडीचा अभाव यामुळे तुर पिकांवर मोठ्या प्रमाणात किड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. ह्या किडीचा प्रादूर्भाव तुरीचे पिक कळी अवस्थेत आल्यावर होत असतो. त्यामुळे या अवस्थेत किडीचे व्यवस्थापन करने महत्वाचे आहे. या करीता हेक्टरी १० कामगंध सापळे पिकात उभावरावेत यामुळे शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचे सर्वेक्षण करता येते व काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते. तसेच पक्ष्यांसाठी हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत जेणे करुन पक्षी पक्षीथांब्यावर बसून अळी खातो व यामुळे देखील काही प्रमाणात अळीचे नियंत्रण करता येते.
असे करावे व्यवस्थापन
क्विनालफॉस २५ इ.सी. २० मिली, इमामेक्टीन बेझांइट ५ टक्के एस.सी. ४.४ ग्राम इंडोक्सीकार्ब १४.५ टक्के एस.सी. ६.६ मीली, क्लोरॅनट्रेनिलीप्रोल १८.५ टक्के, एस.सी. उमीली यापैकी कोणतेही एक किटकनाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे क्रॉपसॅप प्रकल्पाचे किड नियंत्रक गजानन महल्ले, वैशाली वानखडे तसेच प्रादेशिक संशोधन केंद्राचे योगेश इंगळे यांनी सांंिगतले.
फवारणी करताना अशी घ्यावी काळजी
फवारणी करताना एकाच किटकनाशकाची फवारणी लागोपाठ करु नये. किटकनाशकाचा वापर आलटून- पालटून करावा, फवारणीकरीता पाणी स्वच्छ वापरावे, प्रथम द्रावण भांड्यात तयार करुन मग फवारणी करीता वापरावे, चांगल्या परिणामाकरिता द्रावणात स्टिकरचा वापर करावा, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ के.पी.सिंग यांनी दिला आहे.