भाजीपाल्यासोबत डाळीही आवाक्याबाहेर; महागाईचा चटका सोसवेना, सणासुदीला प्रारंभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:36+5:302021-07-23T04:10:36+5:30
पावसाळ्यात भाजीपाल्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे त्याचे दर वधारले आहेत. सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्याने विविध डाळींचे भावदेखील कडाडण्यास सुरुवात ...
पावसाळ्यात भाजीपाल्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे त्याचे दर वधारले आहेत. सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्याने विविध डाळींचे भावदेखील कडाडण्यास सुरुवात झाली आहे. वाढती महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाल्याने आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्यांना पोटाची भूक भागवावी तरी कशी, अशी विवंचना सतावते आहे.
पावसाळ्यात विशेषत: हिरवा भाजीपाला लवकर सडतो. ठोक व चिल्लर विक्रेत्यांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. उत्पादनाच्या तुलनेत भाजीपाला अधिक प्रमाणात खराब होत असल्याने फेकावा लागतो. पर्यायाने याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरवाढीवर होत आहे. त्याचप्रमाणे सणासुदीला सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर नागपंचमी, रक्षाबंधन असे सण आहेत. आतापर्यंत स्थिर असणाऱ्या सर्वच डाळींच्या भावात गेल्या काही दिवसांत दरवाढ झाली आहे. महागाई लोकांचा पिच्छाच पुरवित असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बुडाले. अशातच सणासुदीच्या काळात भाजीपाला व डाळींच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांपुढे मोठा आर्थिक पेच उभा ठाकला आहे.
रोजच्या जेवणामध्ये भाजीपाला तसेच डाळींचा वापर करावाच लागतो. तेव्हा मसुराची डाळ जेवणामध्ये वापरून भूक भागवली जात असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसेनासे झाले आहेत. सध्या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्याचप्रमाणे आगामी सणांमुळे डाळींचे दर अधिक भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजूनही गोरगरीब सर्वांत स्वस्त असणाऱ्या मसूर डाळीचा जेवणामध्ये वापर करीत आहेत.
-------------------------
डाळींचे दर (प्रति किलो )
* हरभऱ्याची डाळ- ६५ रु.
* तुरीची दाळ - १०० रु.
* मूग डाळ - ९० रु.
* उडीद डाळ - १०० रु.
* बरबटी डाळ - ६५ रु.
* मसूर डाळ - ६५ रु.
-----------------------
भाजीपाल्यांचे दर (प्रति किलो )
*पालक - ४० रु.
*गवार - ४० रु.
* कोथिंबीर - ८० रु.
* फूलकोबी - ४० रु.
* पत्ताकोबी - ३० रु.
*कांदा - २५ रु.
*मेथी - ८० रु.
*कारले - ४० रु.
*बटाटे - २५ रु.
-----------------------
* म्हणून भाजीपाला कडाडला.....
पावसाळ्यात शेतजमिनीमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या जास्त वेळ टिकत नाहीत. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपाल्यांच्या वाहतूकखर्चात वाढ होते. पावसाळा सुरू होण्याआधीच दरवाढ होते. पावसाळ्यात भाजीपाल्याची आवकदेखील कमी असते. गत महिन्याच्या तुलनेत या महिन्यात भाजीपाल्याचे दर काहीसे कमी झाले आहेत. पावसाळ्यातील भाजीपाला सर्वांनाच फटका देणारा असतो. प्रामुख्याने यादरम्यान हिरव्या पालेभाज्यांचे दर वाढलेले असतात.
--------------------
* म्हणून डाळ महागली.....
सणासुदीला सुरुवात झाली आहे. स्थिर असणारे डाळींच्या भाव काहीसे वाढले आहेत. सहा महिन्यांपूर्वी डाळींचे भाव प्रचंड वाढले होते. काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा काही दिवसांपासून डाळींच्या दरांमध्ये झालेली वाढ सर्वसामान्यांचे आर्थिक संकट वाढविणारी आहे. नवीन तुरीची दाळ येण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. सध्या डाळींच्या दरवाढीचे कुठलेही ठोस कारण नसताना दरवाढ कशामुळे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
-------------------------
सर्वसामान्यांचे हाल
1) कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत. महागाईने कळस गाठला आहे. भाजीपाल्यांचे तसेच किराणा मालाचे दर प्रचंड वाढल्याने पोटाची खळगी भरावी कशी, ही विवंचना अनेक कुटुंबांना सतावत आहे. महागाईवर नियंत्रण आणले पाहिजे.
- ममता मेश्राम, गृहिणी, बडनेरा.
2) जीवनावश्यक वस्तूंमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे भाजीपाला, किराणा आवाक्याबाहेर गेला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच लोक त्रस्त आहेत. अशातच झालेली प्रचंड दरवाढ भेडसावणारी आहे. सगळ्याच प्रकारच्या दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- कमलाबाई बडगे, गृहिणी, बडनेरा.
-------------------------