अगोदर भोपळा, नंतर २५ गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:03 PM2018-09-17T22:03:54+5:302018-09-17T22:04:18+5:30
बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज सादर केले असता, जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युवा सेनेने याप्रकरणी सोमवारी विद्यापीठावर धडक देत विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची भूमिका घेतली. मात्र, कुलगुरू नसल्याने हे विद्यार्थी परतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज सादर केले असता, जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युवा सेनेने याप्रकरणी सोमवारी विद्यापीठावर धडक देत विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची भूमिका घेतली. मात्र, कुलगुरू नसल्याने हे विद्यार्थी परतले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत आहे. मात्र, या परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामांची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक’ एजन्सीमुळे विद्यापीठावर नामुष्की ओढवली जात आहे. गेल्या वर्षभरापासून परीक्षा आणि वेळेपूर्वी निकालाचा गुंता सोडविला गेलेला नाही. अशातच विद्यापीठाने सुरू केलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षा निकालात असंख्य चुका, त्रुटी असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.
एमसीएचा विद्यार्थी श्रीकांत कोरडे याला द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयात अगोदर नऊ गुण मिळाले होते. त्याने पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. १२ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात आता ३० गुण मिळाले आहे. स्वप्निल जोगी या विद्यार्थ्यास सायलन्ट सर्व्हर कम्प्यूटिंग या विषयात भोपळा होता. पुर्नमूल्यांकनात चक्क २५ गुण मिळाले. रजत देशमुखला याच विषयात आधी सहा व पुनर्मूल्यांकनात २२ गुण देण्याची किमया झाली. स्वप्नील जोगी, अक्षय शिंदे, अक्षय चिंचोळकर, राजल मोरे, अक्षय ईखार, श्रीकांत कोरडे, संचित पाठक,ऋ षिका चव्हाण, शिवानी काळे, शुभम निमजे, भूमिका खंडेलवाल, दिव्यांनी कंकाळे, प्रतीक्षा म्हसंगे, पल्लवी खवशी आदी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गाठले होते.
कुलसचिवांसोबत चर्चा
युवा सेनेचे राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन निकालात असलेले दोष, त्रुटींबाबत कैफियत मांडली. मात्र, अगोदर नापास अन् पुनर्मूल्यांकनात पास याबाबत विद्यापीठ प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. कुलसचिव अजय देशमुख यांना परीक्षा विभागात सुरू असलेल्या अजब- गजब कारभाराची महिमा सांगण्यात आली. परीक्षेत पास असूनही आॅनलाइन निकालात नापास दर्शविल्याने विद्यार्थी हताश झाले आहेत. पुर्नमूल्यांकनासाठी आकारलेले शुल्क परत मिळण्यासाठी बहुतेकांनी धाव घेतली आहे.