अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे तत्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:00 AM2021-09-11T05:00:00+5:302021-09-11T05:00:59+5:30
भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवसा तालुक्यातील शिवणगावकडे येणाऱ्या सूर्यगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी त्यांनी केली.
तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, गटविकास अधिकारी चेतन जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तिवसा मंडळ कृषी अधिकारी अरुण गजभिये, मार्डी मंडळ कृषी अधिकारी विलास केचे आदी उपस्थित होते.
शिवणगाव येथील पावसाने पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी यावेळी केली. तेथील २१८ पंचनामे झाले असून, ९०४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे वैभव फरतारे यांनी सांगितले. सूर्यगंगा नदीवरील पुलामुळे अतिवृष्टीत अनेकदा गावाशी संपर्क तुटतो. या पुलाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहीद गणेश नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नुकसानग्रस्त एकही व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अचूक पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना न्याय प्रदान करावा, अशा सूचना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिल्या.
भिवापूरच्या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावे
भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडली आहे. यावरील १३० हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे १५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती वैभव फरतारे यांनी ना. ठाकूर यांना दिली. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले.
तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे मुसळधार पावसामुळे धरणातील अतिरिक्त पाणी भिवापूरकडे जाणाऱ्या पुलावरून वाहते. त्यामुळे खचलेल्या या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, असे कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य यांना सांगितले.
पावसामुळे रस्ते व वाहतूक बंद होऊ नये, तसेच गावाचा संपर्क तुटू नये, यासाठी कुऱ्हा ते बोर्डा मार्गाचे खोलीकरण योग्य पद्धतीने करावे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी या मार्गावरील तीन विद्युत खांबावरील रोहित्राची उंची वाढविण्याचे निर्देश महावितरणचे राजेश पाटील यांना देण्यात आले. मौजा चेनुष्टा व बोर्डा येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झाले. त्याची पाहणी ना. ठाकूर यांनी केली. येथील नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर झालेल्या नुकसानीबाबत तपशीलवार नोंदणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.