बाजार समितीत भिजलेल्या शेतमालाचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 05:00 AM2022-06-20T05:00:00+5:302022-06-20T05:00:41+5:30
जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून आवक झालेल्या शेतीमालाची हानी झाली. याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न राबवता शेडमध्ये राबविण्यात यावी. तसे न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे पावसाळ्यात खुल्या जागेत खरेदी प्रक्रिया राबवता कामा नये. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे शनिवारी पावसाने नुकसान झाले. त्याचे तत्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न घेता शेडमध्ये करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी बाजार समिती प्रशासकांना दिले.
जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून आवक झालेल्या शेतीमालाची हानी झाली. याची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतीमाल खरेदी प्रक्रिया खुल्या जागेत न राबवता शेडमध्ये राबविण्यात यावी. तसे न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे पावसाळ्यात खुल्या जागेत खरेदी प्रक्रिया राबवता कामा नये. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कुणाचीही गय करणार नाही. संपूर्ण मालाचे सविस्तर पंचनामे करावेत. ही प्रक्रिया गतीने राबवावी. प्रत्येक शेतकरी बांधवाला न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
भिजलेल्या मालाची खरेदी करण्याच्या अडत्यांना सूचना
शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आवक मालाची संपूर्ण खरेदी करण्यासाठी व्यापारी, अडते यांना बाजार समितीमार्फत सूचना देण्यात आली व बहुतांश खरेदी पूर्ण होईल, असा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार बहुतांश खरेदी पूर्ण झाली. यापुढे मालाची खरेदी प्रक्रिया शेडमध्ये राबविण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांनी सांगितले.
१४ कोटींचा विमा, त्यामधूनही भरपाई
- संबंधितांना समितीमार्फत नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार पंचनाम्याची प्रक्रियाही तत्काळ पूर्ण करण्यात येत आहे.
- शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बाजार समितीमार्फत १४ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्याद्वारेही भरपाई मिळवून देण्यात येईल, असे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.