अमरावती बाजार समितीतील सॉफ्टवेअरने नाकारली शेतमालाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 09:21 AM2017-11-23T09:21:01+5:302017-11-23T09:22:33+5:30
नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.
नाफेडमार्फत १८ आॅक्टोबर २०१७ पासून करण्यात आली. शासनाने आधाभूत किंमत जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये शेतमाल आणला. मात्र, बाजार समितीने अटी ठेवल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतमाल व्यापाऱ्यांना विकावा लागला. बाजार समितीत आतापर्यंत १४०० क्विंटल सोयाबीन, उडीद १०० क्विंटल, तर ६०० क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांपुढे शेकडो पोते धान्य रचून असल्याचे चित्र आहे.
काय आहे नेमका प्रकार?
सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी धान्याच्या खरेदीसाठी एकरी उत्पादनाचा नियम ठरविण्यात आला आहे. सोयाबीन एकरी पाच क्विंटल तर उडीद १ क्विंटल २० किलो ग्राह्य धरून याउपर झालेले उत्पादन व्यापाऱ्यांना विकण्याचा सल्ला शासनच देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी अचलपूर बाजार समिती आवारात असलेल्या खरेदी विक्री कार्यालयात शेतकऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.
शासनच म्हणते, उत्पादन वाढवा
शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उत्पादन वाढविण्याचा सल्ला देते; मात्र वाढीव उत्पादन खरेदी करीत नसल्याचा हा प्रकार आहे. बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन आलेले काकडा येथील नीलेश बोंडे, नायगाव येथील मोहन हुड, इसापूरचे मोहन जुनघरे, रवींद्र बोंडे यांनी नाफेडमार्फत खरेदी सुरू असलेल्या खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला.
नाफेडमार्फत खरेदीसाठी मर्यादा ठेवल्याने एकूण शेती व त्यामध्ये उपरोक्त निकषानुसार धान्याचीच खरेदी सॉफ्टवेअर घेत आहे. शासनाने अट टाकल्याने शेतकरी अर्धे धान्य व्यापाऱ्यांकडे विकत आहेत.
- मंगेश हुड, मानद सचिव, खरेदी विक्री संस्था, अचलपूर
सोयाबीन-उडिदासाठी एकरी उत्पादनाचे लादलेले नियम अन्यायकारक आहेत. शासन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्री करण्यास पाठवित असल्याने नुकसान होत आहे.
- दामोधर पाटील, शेतकरी, चाचोंडी