तूर खरेदीसाठी नांदगावात चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 12:03 AM2017-05-08T00:03:58+5:302017-05-08T00:03:58+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर सकाळच्या सत्रात सुरू असलेली ....
वीरेंद्र जगताप आक्रमक : अखेर मोजणीला सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर सकाळच्या सत्रात सुरू असलेली तूर खरेदी दुपारी १२ वाजता अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांचा रोष उफाळला आणि त्यांनी बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन सुरू केले. बाजार समितीत शेतकरी वेठीस धरले जात असल्याची माहिती मिळताच आ.वीरेंद्र जगताप यांनी देखील घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भर उन्हात बाजार समितीबाहेर ठिय्या दिला. हा प्रकार रविवारी घडला. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली. बाजार समिती सचिवांना आंदोलनस्थळी पाचारण करून मध्यम मार्ग काढण्यास बजावले असता त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तूर मोजणी सुरू करण्याचे लेखी पत्र आमदारांना दिले. त्यानंतर तूर मोजणी सुरू झाली आणि हे आंदोलन निवळले.
बारदान्याच्या अभावाचे कारण सांगून बाजार समितीत दुपारी १२ पासून अकस्मात तूर खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे जोपर्यंत तूर खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आ. जगताप यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला .
शेतकऱ्यांचा रोष, पोलिसांना पाचारण
नांदगाव खंडेश्वर : शेकडो संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२० शेतकऱ्यांच्या ४०७९ क्विंटल तुरीचे मोजमाप सुरू होते. परंतु रविवारी दुपारी १२ वाजता बारदानाचा अभाव असल्याचे कारण सांगून अचानक तूर खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला. गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यातील शेकडो शेतकरी बाजार समितीचे उंबरठे झिजवत असताना बारदाना नसल्याचे सांगितल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी यंत्रणेला धारेवर धरले तथा या संपूर्ण प्रकरणाची माहिती आ.वीरेंद्र जगताप यांना दिली.
बाजार समिती व्यवस्थापनाला बारदानाच्या स्टॉकची पूर्वकल्पना नव्हती काय, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांचा वाढत्या रोषामुळे बाजार समितीत मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. याप्रकाराबाबत आ.वीरेंद्र जगताप यांना माहिती मिळताच ते बाजार समितीत पोहोचले. झाल्या प्रकाराबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली व जोपर्यंत तूर मोजणी सुरू होत नाही, तोपर्यंत शेकडो शेतकऱ्यांसह रस्त्यावर ठाण मांडून बसण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. असा आक्रमक पवित्रा आमदारांनी घेतला.
यावेळी ठाणेदार रीता उईके यांनी यशस्वीरित्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. आंदोलनस्थळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल धवसे, विनोद चौधरी, मोरेश्वर वंजारी, विनोद तऱ्हेकर, सुनील गुल्हाने, नरेश ठाकरे, निरंजन रामटेके, सचिन ठाकरे, योगेश इंझळकर, रोशन ठाकरे, सरफराज, यांचेसह शेकडो शेतकरी चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकरी म्हणतात, आमचा
बारदाना घ्या पण तूर मोजा !
तूर मोजणीसाठी होणाऱ्या त्रासाला शेतकरी कंटाळले असून अनेक शेतकऱ्यांनी आमचा बारदाना घ्या आमचा पण आमची तूर मोजा, अशी गळ देखील बाजार समितीला घातली आहे. तूर मोजणीबाबत शेतकऱ्यांच्या अतिशय संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
सरकार शेतकरीविरोधी आहे. सरकारचे तोंड उघडण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे नाक दाबावे लागेल. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही.
- वीरेंद्र जगताप, आमदार
व्यापाऱ्याची कर्मचाऱ्याला मारहाण
वरूडमधील घटना : पोलिसांत तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : स्थानिक बाजार समितीमध्ये तूर मोजणी दरम्यान कर्मचाऱ्याने व्यापाऱ्याकडे सातबाऱ्याची मागणी केली असता व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली
वरूड : स्थानिक बाजार समितीच्या आवारात हजारो क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. यातच व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता बाजार समिती कर्मचारी संजय झरबडे तुरीचे मोजमाप करीत असताना व्यापारी रामकिसन राठोड यांनी त्यांची तूर मोेजण्याची मागणी केली. कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून सातबारा मागितला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि राठोड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली व कार्यालयात जावून शिवीगाळ केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कर्मचाऱ्याने बाजार समिती सचिव नंदकिशोर बोडखे यांच्यासह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. पोलिसांद्वारे पुढील कारवाई वृत्त लिहेस्तोवर सुरू होती. शेतकऱ्यांकडून अल्पदरात खरेदी केलेली तूर शासनाला जादा किमतीत विकण्याचा व्यापाऱ्यांचा गोरखधंदा परिसरात सुरू आहे. मात्र, बाजार समितीकडून सातबारा किंवा शेतकरी असल्याच्या पुराव्याशिवाय एका सातबाऱ्यावर ३० क्विंटल तुरीचीच खरेदी केली जात असल्याने व्यापाऱ्यांची गोची झाली आहे. यामुळे व्यापारी कर्मचाऱ्यांवर राग काढत असल्याची परिसरात चर्चा आहे.