जागेअभावी तूर खरेदी बंद

By admin | Published: February 21, 2017 12:14 AM2017-02-21T00:14:26+5:302017-02-21T00:14:26+5:30

राज्य शासनाच्यावतीने नाफेडद्वारे तुरीची खरेदी सुरू झाली. परंतु माल साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून चार दिवसांपासून तूर खरेदी बंद केली आहे.

Purchase of Tire will not stop | जागेअभावी तूर खरेदी बंद

जागेअभावी तूर खरेदी बंद

Next

साठवणुकीचा प्रश्न : शेकडो शेतकऱ्यांची तूर पडून
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
राज्य शासनाच्यावतीने नाफेडद्वारे तुरीची खरेदी सुरू झाली. परंतु माल साठवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून चार दिवसांपासून तूर खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी तुरीचे पोते घेऊन बाजार समितीत जमल्याचे चित्र आहे. नाफेडचे खरेदी केंद्र बंद असल्याची सूचना सोमवारी फलकावर लावली नव्हती, हे विशेष.
सोमवारी नाफेडचे गुणपरीक्षण अधिकारी कुणाल चारथड व नाफेडचे एजंट काळे हे बाजार समितीत बसलेले दिसून आले. नाफेडची तूर खरेदी सुरू असताना काही व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या नावे तूर विक्री करून हात ओले केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. नाफेडने शेतकऱ्यांची जवळपास ११०० क्विंटल तूर खरेदी केली. वखार मंडळाचे भांडार तुरीने हाऊसफुल्ल झाल्याने तूर साठवणूक करता येणार नाही, असा लेखी पत्रव्यवहार बाजार समितीसोबत करण्यात आला. त्यामुळे १७ व १८ फेब्रुवारीला दोन दिवस तूर खरेदी बंद होती. सोमवारी शेतकऱ्यांनी तुरीचे पीक बाजारात विक्रीसाठी आणले होते. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. बाजार समितीने तो माल रिकामा करून घेतला. परंतु नाफेडच्या अधिकाऱ्याने साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांची तूर घेण्यास सपशेल नकार दिला.
बाजार समितीत व्यापाऱ्यांचे तुरीचे दर ३,९०० ते ४,२०० रूपये प्रतिक्विंटल असल्याने गरजू शेतकऱ्यांना नाईलाजास्तव त्यांच्या पिकाची विक्री करावी लागत आहे. बाजारात तुरीचे दर कमी असल्याने सेतकी वर्ग मोठ्या प्रमाणात नाफेडद्वारे तूर विक्री करण्यास इच्छुक आहे. परंतु या सर्व प्रकारावर सहकार खाते, पणन् खाते नियंत्रण ठेवण्यास कुचकामी ठरल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. २० फेब्रुवारी रोजी १२०० क्विंटल तुरीची आवक चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये झाली आहे. परंतु नाफेडने खरेदी बंद केल्यामुळे हा शेतमाल बाजार समितीच्या आवारात साठवून ठेवण्यात आला आहे.

सध्या चांदूररेल्वे बाजार समिती यार्डवर तीन दिवसांपासून तुरीची भरपूर आवक आहे. गोदाम नसल्याने तहसीलदारांची भेट घेऊन शासकीय धान्य गोदाम उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली असून गोदाम पाहणे सुरू आहे.
- चेतन इंगळे,
सचिव बाजार समिती,
चांदूररेल्वे

बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे खरेदी केलेल्या तुरीमुळे गोदाम पूर्णत: भरले आहे. आता पुढचा साठा करता येणार नाही. तशी सूचना देण्यात आली होती. चांदूररेल्वेत स्वतंत्र गोदाम हवे, गोदाम उपलब्ध झाल्यावर तूर खरेदी करता येईल.
- कुणाल चारथड,
ग्रेडर, नाफेड

Web Title: Purchase of Tire will not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.