पांढऱ्या सोन्याच्या खरेदीचा मुहूर्त निघाला
By admin | Published: November 7, 2015 12:07 AM2015-11-07T00:07:25+5:302015-11-07T00:07:25+5:30
शेतकऱ्यांच्या घरात आलेला कापूस व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याने शासनाने पणन् महासंघाला तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
व्यवहार सुरू : गरजेनुसार केंद्र सुरू होणार
अमरावती : शेतकऱ्यांच्या घरात आलेला कापूस व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याने शासनाने पणन् महासंघाला तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरूवार ५ नोव्हेंबरला राज्यातील २० कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये एक खरेदी केंद्र सुरू केले.
शेतकऱ्यांच्या घरात कापूस पोहोचला असला तरी शासनस्तरावरून हमीभावाने कापूस खरेदीचा मुहूर्त निघालाच नव्हता. त्यामुळे दिवाळीसाठी पैशांची सोय करण्यासाठी शेतकऱ्यांना घरात ठेवलेल्या कापसाची मातीमोल भावाने विक्री करावी लागली. व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन खेडा खरेदीच्या माध्यमातून बेभाव कापूस खरेदी करून त्यांची लूट चालविली होती. शेतकऱ्यांमध्ये उफाळणारा असंतोष लक्षात घेता शासनाने ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे. कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये एक खरेदी केंद्र उघडून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाने कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारपासून खरेदीला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार खरेदी केंद्र सुरू केली जातील. दोन दिवसांत पणन महामंडळाने सुमारे २ हजार १६५ क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
- एन.पी.हिराणी,
अध्यक्ष पणन महासंघ.