पेढी नदीचे होणार पुनरूज्जीवन
By admin | Published: June 4, 2014 11:20 PM2014-06-04T23:20:54+5:302014-06-04T23:20:54+5:30
संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगावच्या विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीतून पेढी नदीच्या पुनरूज्जीवन कार्याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. ४0 कोटींच्या या विकास आराखड्यांतर्गत प्राप्त
अमरावती : संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी वलगावच्या विकास आराखड्यांतर्गत मंजूर निधीतून पेढी नदीच्या पुनरूज्जीवन कार्याला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. ४0 कोटींच्या या विकास आराखड्यांतर्गत प्राप्त ४ कोटींच्या निधीतून पेढी नदीचे खोलीकरण तसेच संभाव्य पूरहानी टाळण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहेत. आ. यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने नदी पुनरूज्जीवनाचा जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प मार्गी लागला आहे.
३७८६.८४ लक्ष रूपयांच्या या विकास आराखड्यास राज्य शासनाने २२ ऑक्टोबर २0१२ रोजी मान्यता दिली आहे. विकास आराखड्यास मंजूर ५ कोटींच्या अर्थसंकल्पित निधीपैकी शासनाकडून बीडीएसवर ४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून पेढी नदीला पूर प्रतिबंधक निधीचे बांधकाम, घाटाची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या बांधांची दुरूस्ती आदी कामे केली जाणार आहेत.
पावसाळ्यात पेढी नदीला आलेल्या पुरामुळे आसपासच्या गावांची होत असलेली प्रचंड हानी लक्षात घेता पूर प्रतिबंधक भिंतीचे बांधकाम करणे अत्यावश्यक झाले होते. पेढी नदी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी आहे. परंतु सततच्या पुरामुळे नदीच्या प्रवाहाची दिशा बदलली आहे. त्यामुळे पुराचे पाणी गावात अस्ताव्यस्त पसरते. या पाण्यामुळे वलगाव व आसपासच्या छोट्या-छोट्या खेड्यातील नागरिकांना सतत धोका संभवतो.
हा धोका कायमचा टाळण्यासाठी गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण करण्यात येईल. नदीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजनांचे प्रावधान आहे. नदीतील पाणी हे परिसरातील नागरिकांसाठी जीवघेणे न ठरता ते जीवनदायी ठरावे, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.