वाळू माफियांनी खोदून काढले पूर्णा नदीचे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:17 PM2021-03-19T15:17:19+5:302021-03-19T15:23:11+5:30
Amravati News भातकुली तालुक्यातील पोहरा येथील परवानगी असताना, रेती तस्करांनी अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातून रेतीचोरीचा सपाटा लावला आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भातकुली तालुक्यातील पोहरा येथील लिलाव झालेल्या वाळूघाटातील रेतीची उचल न करता इतर ठिकाणांहून रेती चोरून नेली जात असल्याचा प्रकार उघड होताच, महसूल विभागाची झोप उडाली आहे. दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून घाटमालकांसह चोरांनी पूर्णा नदीच्या पात्रात तीन फुटांपेक्षा अधिक खोदकाम केल्याचे गंभीर चित्र आहे. त्याद्वारे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपासून जिल्ह्यात रेतीबाबत सर्वत्र ओरड आहे. भातकुली, धामणगाव रेल्वे ते दर्यापूर, तिवसा येथील एकूण नऊ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामध्ये पोहरा पूर्णा येथील रेतीघाटाचा लिलाव १ कोटी १२ लक्ष रुपयांपेक्षा अधिक दराने झाला. त्या मोबदल्यात ३९७५ ब्रास रेती उचलण्याची परवानगी घाटमालकाला देण्यात आली. त्यासाठी नियम व अटी लागू करण्यात आल्या. प्रत्यक्षात सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून वाटेल तेथून बेछूट नदीपात्राची चाळण केली जात असल्याचे गंभीर चित्र आहे. परंतु, महसूल विभाग पाहिजे त्या प्रमाणात गंभीर नसल्याचे वास्तव आहे. दोन ब्रासऐवजी ट्रकमध्ये तीन ब्रासपेक्षा अधिक रेती नेली जात आहे.
पूर्णा नदीपात्रात नियमाची ऐसीतैसी
भातकुली तालुक्यातील पोहरा येथील परवानगी असताना, रेती तस्करांनी अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातून रेतीचोरीचा सपाटा लावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. जिल्हा प्रशासनाला एका तक्रारीनंतर जाग आली. महसूल प्रशासन पहाटे ५ पासून घटनास्थळी गेल्यावर वाळूने भरलेले पाच ट्रक पकडण्यात आले. घटनास्थळी दहा ते वीस फुटांपेक्षा अधिक खोल खड्डे रेतीचोरांनी केल्याचे चित्र आहे. नियमावली धाब्यावर बसविण्यात आली आहे.
पाच ट्रकमालकांना कारणे दाखवा
अचलपूर महसूल विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी येलकी पूर्णा परिसरात पूर्णा नदीपात्रातून पाच ट्रकवर कारवाई केली. या सर्व ट्रकमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारचा वेळ देण्यात आला होता. परंतु, त्यांनी म्हणणे मांडले नाही. त्यामुळे पुन्हा सोमवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. प्रत्यक्ष त्यांना अजूनपर्यंत दंड ठोठावण्यात आला नाही.
पोहरा पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पात्रात अर्धा मीटरपासून खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे.
सुनील रामटेके, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अमरावती
येलकी पूर्णा नदीपात्रातून रेती चोरून नेणाऱ्या पाच ट्रकमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दंड किंवा इतर कारवाई करण्यात येईल.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर