पाच हजारांत मुरुम टाका, अन्यथा माफी मागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:27 AM2018-07-13T01:27:15+5:302018-07-13T01:28:11+5:30
नगरसेवक संतोष कोल्हे यांनी पाच हजारांत मुरुम आणून शहरात टाकावा. हे होत नसेल, तर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असे आव्हान दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीने त्यांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : नगरसेवक संतोष कोल्हे यांनी पाच हजारांत मुरुम आणून शहरात टाकावा. हे होत नसेल, तर जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागावी, असे आव्हान दर्यापूर पालिकेच्या स्थायी समितीने त्यांना दिले आहे.
नगरसेवक कोल्हे यांनी दर्यापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीने शहरातील सखल भागातील पाणी काढण्यासाठी साडेनऊ हजार रुपयांत मुरुम टाकण्याचे कंत्राट दिल्याबद्दल टीका केली होती. अवघ्या पाच-सहा हजारांत मिळणाऱ्या मुरुमाकरिता जादा रक्कम देण्याचा खटाटोप कशासाठी, असा आक्षेप त्यांनी पत्रपरिषदेतून घेतला होता. त्याला स्थायी समितीने बुधवारी पत्रपरिषदेतून प्रत्युत्तर दिले.
पावसाळ्यात खोलगट भागात पाणी साचते. याचा नागरिकांना व राहदारीला मोठा त्रास होतो. याकरिता मुरुम टाकून तेथील पाणी काढण्यात येते. प्रतिवर्षी हा उपक्रम पालिका करीत असते. पालिकेच्या व जनतेच्या हितसाठी नगरसेवक संतोष कोल्हे जर पाच हजारात मुरुम उपलब्ध करून देत असतील, तर आम्ही त्यांना मंजुरी देऊ, अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
पत्रपरिषदेला उपाध्यक्ष सागर गावंडे, निशिकांत पाखरे, सागर गावंडे, अमोल गहरवाल, महिला व बाल कल्याण सभापती प्रतिभा शिवणे, आरोग्य सभापती ताजखातून अजीजखाँ, अनिल बागळे, विक्रमसिंह परिहार, रूपेश मलिये, दिलीप चौहान यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.